लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सध्या कोरोनाबाधितांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणावर भासत आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांनी घरीच पालथे झाेपल्यास रक्तातील ऑक्सिजन पातळी वाढू शकते, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे घरच्या घरी असे साधे, सोपे उपायही बरे होण्यासाठी रुग्णांना फायद्याचे ठरणार आहेत.
आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने कोरोनाग्रस्त रुग्णांना, विशेषत: गृह विलगीकरणातील रुग्णांना पालथे झोपण्याचा सल्ला दिला आहे. या रुग्णांनी पालथे झोपल्यास त्यांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढते. श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर तो काही प्रमाणात कमी होतो. पाठ बेडवर टाकून उताणे झोपलेल्या रुग्णाला हळुवारपणे पोटावर म्हणजेच पालथे झोपविण्याने रक्तातील ॲाक्सिजनची पातळी वाढते. या पद्धतीचा स्वीकार आधुनिक वैद्यकशास्त्राने केल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. तसेच रुग्ण जर गृह विलगीकरणात असेल, तेव्हा त्याच्या ऑक्सिजनच्या तपासणीबरोबरच तापमान, रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी याची नियमित तपासणी केली जाते.
रक्तातील ऑक्सिजनच्या प्रमाणात होणाऱ्या कमतरतेचे लवकर निदान झाले नाही, तर गुंतागुंत वाढते. वेळेवर पालथे झोपवले व श्वसनास मदत केली, तर अनेक रुग्णांचे प्राण वाचवता येतील, असे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. संजय जानवळे यांनी सांगितले.
चौकट
असा वाढवा रक्तातील ऑक्सिजन...
झोपण्याच्या पद्धतीची चार आवर्तने वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितली आहेत. दोन तास पालथे, दोन तास उजव्या, नंतर डाव्या कुशीवर, तर नंतर उताणे अशा पद्धतीने आठ तासांच्या झोपेचे हे गणित मांडण्यात आले आहे. अशाप्रकारे वारंवार स्थिती बदलणे उपयुक्त ठरते. हे दिवसात अनेकवेळा करावे. पालथे झोपल्याने श्वसन सुधारते. फुप्फुसातील वायुकोषिका उघडल्या जातात. श्वास घेणे सुलभ होते. हे पालथे झोपण्याचे फायदे आहेत.
चौकट
पालथे झोपण्याचे फायदे...
पालथे झोपण्याने हृदयाचा फुफ्फुसावर येणारा ताण कमी होऊन ऑक्सिजन स्तर सुधारतो. उताणे झोपल्यानंतर हा ताण वाढलेला असतो. पालथे झोपण्याबरोबरच उताणे, उजव्या व डाव्या कुशीवरची सम-समान दोन तासाची एकूण आठ तासाची चार आवर्तनेही पाळावीत. त्यामुळे श्वसन व्यवस्था व अन्य शारीरिक प्रणाली सुधारते. याचा रुग्णांना फायदा होतो.
- डॉ. अनिल मडके, श्वसनविकार तज्ज्ञ, सांगली
चौकट
...तर पालथे झोपू नये
गर्भवती महिलांनी, पोटाची शस्त्रक्रिया झालेल्यांनी पालथे झोपू नये. याशिवाय ज्यांना हृदयाचा त्रास आहे किंवा एखादी शस्त्रक्रिया झाली असेल, त्यांनी डॉक्टरांचा याबाबत सल्ला घ्यावा. ज्यांना यापैकी कोणताही त्रास नाही, त्यांनी हा उपाय करावा.
- डॉ. सचिन गावडे, हृदयविकार तज्ज्ञ, सांगली
चौकट
सध्या कोरोना काळात शरीरातील ऑक्सिजनचा स्तर अत्यंत महत्त्वाचा आहे. तो चांगला ठेवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यामुळे सामान्य रुग्णांनी विलगीकरणात पालथे झोपण्याबरोबरच वेगवेगळ्या कुशीवर झोपण्याचे उपाय अमलात आणावेत.
- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक
चौकट
चौकट
जिल्ह्यातील एकूण रुग्ण : ८१४८६
रुग्णालयात उपचार सुरू असलेले : १४,१०२
गृह विलगीकरणातील : १०९३४