सांगली : महापालिका क्षेत्रातील घोषित झोपडपट्ट्यांचे येत्या सोमवारपासून मोजमाप होणार आहे. तसा निर्णय आयुक्त सुनील पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन समितीसोबतच्या बैठकीत घेतला. याबाबतचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले.झोपडपट्टी पुनर्वसन समितीसोबत आयुक्तांनी बैठक घेतली. या बैठकीस उपायुक्त राहुल रोकडे, सहायक संचालक नगररचना विनय झगडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, नगर अभियंता भगवान पांडव, सहायक आयुक्त नितिन शिंदे, समितीचे अध्यक्ष सुजितकुमार काटे, उपाध्यक्ष रवींद्र सदामते , श्रीराम सासणे, सूरज पवार, मोहसीन इनामदार, निर्भय काटे, गिरीश उमदी उपस्थित होते.पहिल्या टप्प्यात सहा झोपडपट्ट्यांचे मोजमाप करण्यात येणार आहे. सोमवारपासून प्रत्यक्ष मोजमापास सुरुवात करण्याचे आदेश आयुक्त सुनील पवार यांनी नगररचना विभागाला दिले. यामध्ये संजयनगर पत्रा चाळ, चिंतामणीनगर झोपडपट्टी, गोकुळनगर, भीमनगर, नवीन वसाहत आणि मिरजवाडी या सहा झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. त्यानंतर उर्वरित घोषित झोपडपट्ट्यांचेही मोजमापही केले जाणार आहे.गेल्या २० वर्षांपासून झोपडपट्ट्या कायम करून झोपडी नावावर करून देण्यासाठी पुनर्वसन समिती पाठपुरावा करत आहे. झोपडपट्ट्यांचे मोजमाप झाल्यानंतर त्याचे नकाशे तयार करून त्यांची झोपडीची जागा, संबंधितांच्या नावावर केली जाणार आहे. या निर्णयाचे समितीने स्वागत केले. भाजपाचे जेष्ठ नेते शेखर इनामदार, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक अभिजित भोसले, संतोष पाटील यांनीही सहकार्याची भूमिका घेतली.
सांगली महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचे होणार मोजमाप, आयुक्तांनी दिले आदेश
By शीतल पाटील | Published: August 22, 2023 5:48 PM