आज होळी पुनव अर्थात शिमगा! वाईट-वंगाळ जाळून होळीभोवती शिमगा करण्याची आणि एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक करून राजकीय धुळवड रंगवण्याची परंपरा जिवापाड जपणाऱ्या आमच्या नेत्यांच्या प्रांतातली ही मुशाफिरी...स्थळ पहिलं : भाजपचं कार्यालय. तिथं एकच लगबग सुरू असलेली. पूर्वभागात पाणी पेटल्यानं यंदा भाजपनं हातचं राखून होळी साजरी करायचं ठरवलंय. (हो! इथं होळीच साजरी होणार, शिमगा नाही! शिमग्याचा हक्क आता विरोधकांचा.) म्हैसाळ योजनेचं पाणी मिरजेच्या सुरेशभाऊ खाडेंनी जतपर्यंत जाणारच नाही, याची दक्षता घेतलीय. ते कसंबसं कवठ्याच्या कुचीपर्यंत जाऊन थांबलंय. त्यातच तासगावच्या मणेराजुरी-गव्हाणनंही पाणी उचललंय. त्यामुळं बनेवाडी योजनेतल्या गावांची अधिकाऱ्यांच्या नावानं ‘बोंब’ सुरू झालीय. पैसे भरूनही तिथं पाणी नाही! पाणी कवठ्यातनं पुढं सरकेना, परिणामी जतमधले एकेकाळचे खाडेंचे ‘किंगमेकर’ जगतापसाहेब तापलेत. अख्खा आटपाडी आणि जत तालुका, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज पूर्वचा निम्मा भाग उन्हानं भाजून निघालाय. तिथं होळीचा ‘निवद’ दाखवायलाही पाणी नाही. टेंभू-म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी टाहो सुरू झालाय. जतचा उत्तरभाग पैसे घेऊन तयार आहे, पण वितरण व्यवस्था नाही. पाणी कधी येईल, हे कुण्णीच सांगू शकत नाही!! असं असलं तरी होळीला पोळी भाजायचीच आणि पाणी आणल्याचं श्रेय घ्यायचं, याची तयारी या कार्यालयात सुरू झालीय. अधिवेशनाच्या नावाखाली खाडे, जगतापसाहेब मुंबईतच थांबलेत. (खरं तर हे त्रांगडं मिटेपर्यंत इकडं कसं यायचं, या प्रश्नानं त्यांचं डोकं भणाणून गेलंय.) आणि इकडं चार दिवसात जतला पाणी देणार, अशी गर्जना पंधरवड्यापूर्वी करणाऱ्यांच्या नावानं शिमगा सुरू झालाय. होळीच्या आधीच पाणी पेटलं असलं तरी ‘घोषणा महर्षी’, ‘गाजर विशारद’, ‘गुळमाट वाक्चातुर्य रत्न’, ‘चर्चेचं गुऱ्हाळ सम्राट’ वगैरे वगैरे किताब भूषविणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांतदादांनी भाजपातले अतृप्त आत्मे थंड करण्यासाठी कंबर कसलीय. आधी ते शिराळ्यात जाऊन नाईकसाहेबांना मंत्रीपदाचं गाजर दाखवतात, नंतर आटपाडीत गोपीचंद पडळकरांच्या ‘मोठ्या’ सत्काराच्या तयारीला लागावं, असं कार्यकर्त्यांना बजावतात, तर त्याच संध्याकाळी संजयकाकांचाही लवकरच ‘सन्मान’ करू, अशी ग्वाही देतात! भरीस भर म्हणून तासगाव कारखान्याचा बसलेला पांढरा हत्ती उठवू, असंही छातीठोकपणे सांगतात. कडेगावचे पृथ्वीराजबाबा आणि संजयकाकांनी ‘तासगाव’ सुरू करण्याचा चंग बांधलाय म्हणे! मागचं सगळं राजकारण, अगदी काकांनी मशिनरी उपसून नेल्यानंतर झालेला शिमगासुद्धा विसरून धुराडं पेटवण्याचं त्यांनी ठरवलंय.एकीकडं होळीची ही गडबड सुरू असताना कार्यालयात सांगलीचे मुन्नाभाई आणि कुपवाडचे धनपालतात्या आलेले. दोघांसोबत गणवेश शिवणारा ‘टेलर’. तीन महिन्यांपूर्वी मेळाव्यासाठी शिवलेल्या खाकी चड्ड्या आता टाकून द्याव्या लागणार आहेत. त्यामुळं फुलपँट शिवण्यासाठी सामुदायिक मापं द्यायचा जंगी कार्यक्रम दोघांनी आयोजित केलाय म्हणे! पण तिथं आल्याआल्या दोघांना नव्यानं कळलं की, भाजप आणि ‘आरएसएस’चा काडीमात्र संबंध नाही! तसं संघाच्याच लोकांनी सांगितलंय. आता तशी पाटीच तिथं लावणार आहेत म्हणे!स्थळ दुसरं : घड्याळवाल्यांच्या कार्यालयात तर नुसता शुकुशकाट. दुष्काळावर बोलावं तर साहेबांशिवाय कुणाचा अभ्यास नाही. पालकमंत्री तब्बल चौदा महिन्यांनी आटपाडीत गेले, पण टेंभूबाबत त्यांनी चकार शब्द काढला नाही. घड्याळवाल्यांनी शिमग्याची ही नामी संधी बघताबघता घालवली. साहेबांच्या कारखान्याच्या जत युनिटनं ‘म्हैसाळ’च्या पाणीपट्टीची एक दमडीही भरली नाही. त्यामुळं जतमध्ये पाण्याचं वांधं झालंय. जतचे जगतापसाहेब आणि प्रभाकरभाऊ जाधव ही साहेबांचीच माणसं, पण तीही आता तोंडावर उलटा हात मारून घेताहेत. (अर्थात खासगीत हं!) इकडं सांगलीत टोलवर शिमगा करावा, तर हात अडकलेले. मंजुरीपासून टेंडरपर्यंत आणि वर्क आॅर्डरपासून ‘सुप्रिम’च्या ‘सोनाई’ला काम देईपर्यंत सगळ्यात साहेबांनी जातीनं लक्ष घातलं होतं. पूर्वाश्रमीच्या आपल्याच पाटलांना काम देण्यात आलेलं. (आता ते पाटील कुठं आहेत, कोण जाणे! बजाज कंपनीला विचारायला हवं.) मग आवाज कसा उठवायचा? भगवा खांद्यावर घेतलेल्या चिकुर्डेच्या अभिजितआबांनी तशी पेटती काडी टाकल्यावरही घड्याळवाले चिडीचूप बसलेत, हे बहुदा त्यामुळंच. किंवा साहेबांनीच अभिजितआबांना ‘अदखलपात्र’ ठरवण्याचा आदेश दिला असावा. साहेब स्वत: इथं असल्यावर चंद्रकांतदादांना ‘टार्गेट’ करतात, तर तिकडं विधिमंडळात सरकारवर हल्लाबोल करतात. पण इकडं घड्याळाला किल्ली दिली नसल्यानं काट्यांची गती मंदावलीय. नाही म्हणायला महापालिकेत तेवढी अधेमध्ये धुळवड खेळली जाते, पण तीही ‘मॅनेज’ झालेली असते म्हणे!स्थळ तिसरं : वसंतदादा साखर कारखान्यावरचं ‘साई’ निवासस्थान. काँग्रेसमध्ये नवा गट निर्माण झालेला, त्याचं हे उगमस्थान. या निवासस्थानावरून विशालदादांनी पक्षाच्या वर्तुळात केव्हाच ‘एंट्री’ केलीय. मदनभाऊंच्या पश्चात महापालिकेत शेखर मानेंसारखे सैरभैर झालेले मासे त्यांच्या गळाला लागलेत. त्यातून उपमहापौर पदही गटाकडं आलंय. विशालदादांना आता विधानसभा खुणावू लागलीय. त्यामुळं गाडगीळ सराफांना ‘टार्गेट’ करण्याचा कार्यक्रम त्यांनी आखलाय. ‘म्हैसाळ’चं पाणी पेटताच त्यांनी हुशारीनं वसंतदादा कारखान्यातर्फे एक कोटी भरले. ‘म्हैसाळ’च्या कार्यक्षेत्रातून कारखान्याला ऊस कमी येत असतानाही त्यांनी हे पैसे लावलेत! अंगाला रंग न लागता होळी खेळण्यात ते माहीर. वसंतदादा कारखान्याची काजळी, कर्ज प्रकरण, जप्तीची कारवाई त्यांनी हुशारीनं सर्वांदेखत उधळून लावली. त्यांचे बंधू प्रतीकदादा मात्र बिनपाण्याच्या होळीत चिंब भिजलेत. अधूनमधून इस्लामपूरकर साहेब, संजयकाका वगैरेंवर धुळवडीची राळ उडवण्याचा त्यांचा एककलमी कार्यक्रम सुरू असतो. सोनसळकर साहेब वरून तरी शांत आहेत. ‘भाजपला मतं दिलीत, आता भोगा फळं!’ असं मात्र ते सगळीकडं सुनावत असतात. कधी ते विशालदादांना बळ देतात, तर कधी किशोरदादा जामदारांना बंगल्यावर बोलावतात. कधी घोरपडे सरकारांना बैठकीचं निमंत्रण धाडतात, तर कधी दिनकरतात्यांना पंखाखाली घेतात! आणि हळूच संग्राम देशमुखांच्या कारखान्यालाही भेट देतात!! (तेवढाच धुळवडीच्या गुलालाची दोन बोटं कपाळाला लावून घेण्याचा कार्यक्रम!) साहेबांनी आणि देशमुखांनी हातात-हात घालून ‘ताकारी’चं पाणी आपापल्या साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात फिरवलंय. त्याची वसुलीही पद्धतशीर ठरलेली. त्यामुळं पाण्याबाबतचा शिमगा त्यांच्याकडं चुकूनच ऐकायला येतो. आता पृथ्वीराजबाबांनी भाजपचं जिल्हाध्यक्षपद पदरात पडताच पलूस-कडेगावात जनसंपर्काचा धडाका लावलाय. त्यातच मागच्या वेळेला सोनसळकर साहेबांनी ‘आता शेवटचीच विधानसभा’, असं जाहीर केल्याचं ऐकिवात होतं. मग आता पुढं काय, याचा शोध सुरू आहे म्हणे!जाता-जाता : जिल्ह्यातील पाणीदार नेते अर्थात कवठ्याचे घोरपडे सरकार आणि सांगलीवाडीच्या दिनकरतात्यांची हौस पुरती फिटलीय. लोकसभेच्या मैदानात दोघांचीही एकेकदा जमिनीला पाठ लागलीय. दोघंही मागच्या वेळेला पुन्हा लांग चढवण्याच्या तयारीत होते, पण मागून आलेल्या संजयकाकांनी या दोघांना बगल दिली. त्यांच्याच खुराकावर शड्डू ठोकून लोकसभेचं मैदान मारलं. दोघंही आशेनं भाजपमध्ये गेले. तिथं आधीच गर्दी असल्यानं कानकोंड्यागत बसावं लागलं. (भाजपचं ‘कमळ’ फुलवणाऱ्या अनेकांचं असंच झालंय.) काकांनी हात सोडला. इस्लामपूरकर वस्तादांनी पाठीवरचा हात काढला. आता दोघं पुन्हा सोनसळकर साहेबांकडं परतलेत. संजयकाका आणि वस्तादांवर चिखलफेक करून धुळवड रंगवायची, असा ‘पण’ घोरपडे सरकारांसोबत काही नेत्यांनी केल्याची कुजबुज सुरू झालीय. पण पाणी पेटल्यानंतर जागं झालेल्या नेत्यांची धुळवड रंगणार कशी..?
पेटलेल्या पाण्याचा शिमगा आणि (न) रंगलेली धुळवड
By admin | Published: March 22, 2016 11:27 PM