सांगली : येथील वसंतदादा बँकेच्या अवसायक स्मृती पाटील यांची महापालिका उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे स्मृती पाटील यांना बँकेच्या अवसायक पदावरून सहकार विभागाने हटविले आहे. शासनाने सहायक निबंधक उर्मिला राजमाने यांची अवसायक म्हणून नियुक्ती केली असून सोमवारी त्यांनी बँकेचा पदभारही स्वीकारला आहे.स्मृती पाटील यांच्याकडे वसंतदादा बॅँकेच्या अवसायकपदाची जबाबदारी शासनाने दिली होती. त्यांनी पुन्हा महापालिकेत प्रतिनियुक्तीवर येण्याचे प्रयत्न चालवले होते. त्यात त्यांना यशही आले. मात्र, उपायुक्त राहुल रोकडे यांनीही त्यांच्या महापालिकेतील प्रतिनियुक्तीला दोन वर्षांची मुदतवाढ घेण्यात यश मिळविले. त्यामुळे पाटील यांचे महापालिकेच्या मुख्यालयात उपायुक्त होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. मिरजेतील उपायुक्त पदाचा प्रभारी पदभार नगरसचिव चंद्रकांत आडके यांच्याकडे होता. आडके यांच्याकडील हा पदभार काढून तेथे पाटील यांना रुजू करण्यासाठी प्रयत्न झाले. महापालिका पदाधिकारी व आयुक्तांना वसंतदादा बॅँकेच्या अवसायकाचा पदभार माझ्याकडेच असल्याने महापालिकेच्या बॅँकेत अडकलेल्या ४० कोटींच्या ठेवी परत करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाहीही दिली होती. मार्च २०२३ अखेर ५ कोटी रुपये परत करण्याचा स्मृती पाटील यांनी शब्द दिल्याचे स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी यांनी जाहीरपणे सांगितले.आडके यांच्याकडील मिरज उपायुक्तांचा प्रभारी पदभार काढून घेऊन तेथे स्मृती पाटील यांची वर्णी लावली. पाटील यांनी वसंतदादा बँकेतील ठेवीदारांच्या एकूण ठेवी पैकी ५ टक्के ठेवी परत करण्याबाबत सहकार आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला. मात्र, पाटील यांनी महापालिकेला ठेवी परत करण्याबाबत दिलेल्या आश्वासनाच्या विरोधात काही ठेवीदारांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊनच स्मृती पाटील यांना अवसायक पदावरून हटविल्याची चर्चा आहे. त्यांच्या जागी उर्मिला राजमाने यांची नियुक्ती केली. राजमाने यांनी यापूर्वी वसंतदादा बॅँकेच्या अवसायक मंडळात सहा वर्षे कामही केले आहे.देणे १५९ कोटी...येणे १४७ कोटीवसंतदादा बॅँकेत ८८ हजार ठेवीदारांना १५९ कोटींच्या ठेवी परत करायच्या आहेत. यात सांगली, पुणे, मुंबईसह ३५ शाखांतील ठेवीदारांचा समावेश आहे. बॅँकेकडे सध्या कर्ज वसुलीतील आठ कोटी रुपयेच शिल्लक आहेत; पण ठेवीदारांचे देणे १५९ कोटी रुपये आहे. बॅँकेच्या २५०० कर्जदारांकडून १४७ कोटी रुपयांची कर्जवसुली बाकी आहे. ही व्याजासह रक्कम वसुलीचे नूतन अवसायकांसमोर मोठे आव्हान आहे.
वसंतदादा बँकेच्या अवसायकपदावरून स्मृती पाटील यांना हटविले, उर्मिला राजमाने यांच्याकडे बँकेची सूत्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 4:17 PM