अविनाश कोळीसांगली : कमी पैशात कृषी औषधे पुरविण्याचे आमिष दाखवून मिरज तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग सोनी परिसरातील एका टोळीने सुरू केला आहे. गुजरातमधील एका कंपनीकडून हा माल आणून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा कर चुकवित बोगस औषधांचा काळाबाजार सध्या जोमात आहे. यातून टोळीतील सदस्य अल्पावधित मालामाल झाले असून शेतकरी मात्र कंगाल होत आहेत.मिरज तालुक्यातील काही गावात या टोळीने त्यांचे साम्राज्य निर्माण केले आहे. बाजारातील कृषी औषधांच्या दरापेक्षा ३० ते ५० टक्के कमी दरात औषधांचा पुरवठा केला जातो. पैसे वाचविण्यासाठी हजारो शेतकरी या टोळीच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांच्याकडे आगाऊ पैसे भरून बुकिंग केले जाते. अत्यंत घातक रसायनांचा वापर करून शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ केला जात आहे. या खेळात अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसानही झाले आहे. टोळीविरोधात तक्रार करण्याचे धाडस शेतकऱ्यांकडून होत नसल्याने टोळीने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.
रात्रीच येतो ट्रक, रात्रीत होते वाटपशेतकऱ्यांकडून बुकिंग झाल्यानंतर ट्रकभर मालाची ऑर्डर गुजरातमधील कंपनीला दिली जाते. हा ट्रक शासकीय यंत्रणांना चकवा देत कर्नाटकमार्गे मिरज तालुक्यातील सोनी किंवा जवळच्या गावांमध्ये येतो. रात्रीच हा ट्रक येईल, असे नियोजन केले जाते. ट्रक आल्यानंतर रातोरात त्याचे वाटप संबंधित शेतकऱ्यांना केले जाते. माल शिल्लक ठेवला जात नाही.
हवालामार्फत होतो व्यवहारया सर्व औषधांचा व्यवहार हवालामार्फत होतो. गुजरातच्या संबंधित कंपनीलाही हवालामार्फत पैसे पाठविले जातात. त्यामुळे या व्यवहाराची अधिकृत नोंद कुठेही सापडत नाही.
टोळीतील सदस्यांच्या राहणीमानात बदलबोगस औषधांचा पुरवठा करून, कर चुकवून टोळीतील सदस्य अल्पावधित मालामाल झाले आहेत. त्यांच्या राहणीमानातही कमालीचा बदल झाला आहे. सावकार म्हणून आता ते मिरवित आहेत.
कायद्याची अंमलबजावणी कुठे आहे?राज्यात कीटकनाशक कायदा-१९६८ व कीटकनाशक नियम-१९७१ मधील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही. नफेखोरीसाठी अनेक कंपन्या व टोळ्या शेतकऱ्यांच्या जिवाशीही खेळत आहेत. त्यामुळे या टोळीची पाळेमुळे नष्ट करण्याची गरज आहे.