जत : तालुक्यात वाढत्या उकाड्यामुळे साप बाहेर पडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. आसंगी तुर्क येथील मोटेवाडी येथे एका महिलेचा विषारी सर्पदंशाने मृत्यू झाला होता. तसेच मुचंडी येथील एका महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. राजोबाचीवाडी येथे घराच्या बाहेर झोपलेल्या एका वृध्दाला सर्पदंश झाला. त्याचाही मृत्यू झाला आहे. तालुक्यात सर्पदंशाच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
———————
वळसंग येथे कोरोना प्रतिबंधक उपाय
वळसंग : वळसंग (ता. जत) येथे आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने काेराेना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. गावातील शाळेत विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बंडगर, ॲड. एम. के. पुजारी, ग्रामपंचायत सदस्य के. डी. पुजारी, रमेश माळी, महादेव कांबळे, डॉ. रेखा बंडगर यांनी उपाययोजना, विलगीकरण कक्ष याबाबत नियोजन केले.
———————————
समडोळी - डिग्रज रस्त्याची दुरवस्था
सांगली : समडोळी-कसबे डिग्रज रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून दरराेज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र सध्या रस्ता पूर्णपणे उखडला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यात वाहने घसरून सातत्याने अपघात होत आहेत. या भागातील ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही त्याकडे संबंधित शासन आणि नेत्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे त्वरित हा रस्ता दुरूस्त करावा, अशी मागणी होत आहे.
—————-