कडेगाव (जि. सांगली) : राज्यातील अनेक पोट निवडणुकामध्ये बिनविरोध करण्याचे संकेत काँग्रेसने पाळलेले नाहीत यामुळे आता पलूस -कडेगाव विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूक बिनविरोध न करता ताकदीने लढवण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे असे प्रतिपादन भाजपा चे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केले. पलूस -कडेगाव विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यात आला . यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख बोलत होते.यावेळी खासदार संजय पाटील ,आमदार शिवाजीराव नाईक ,आमदार सुरेश खाडे,आमदार सुधीर गाडगीळ ,आमदार विलासराव जगताप , माजी मंत्री अजितराव घोरपडे ,अतुल भोसले ,राजाराम गरुड उपस्थित होते.
यावेळी बोलताना पृथ्वीराज देशमुख पुढे म्हणाले की ,ही निवडणूक ताकतीने लढवायची असून कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवा करून प्रचार करावा .पलूस-कडेगाव मतदारसंघातील पोटनिवडणूकीच्या प्रचारात भाजपाची जिल्ह्यातील अखंड टीम सक्रिय होणार आहे.मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटात एक मंत्री प्रचार सभा घेणार आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना संजय पाटील म्हणाले संग्रामसिंह देशमुख यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संधी मिळाली आणि त्यांनी पारदर्शक व कुशल कारभारातून आपली क्षमता सिद्ध केली आहे .त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे .आता ताकदीने व जिद्दीने निवडणूक लढवून विजय खेचून आणण्याचा निश्चय भाजप नेते आणि कार्यकर्त्यानी केला आहे . असे खासदार संजय पाटील यांनी सांगितले .
यावेळी संग्रामसिंह देशमुख म्हणाले सर्वसामान्य जनता आणि भाजपने मला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची संधी दिली .या संधीचे सोने करीत जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शक व आदर्शवत केला .आता विधानसभा निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते जीवाचे रान करतील .कार्यकर्त्यांवर आमचा भरोसा आहे त्यामुळे निवडणूकीत निश्चितपणे यश मिळणार आहे .असे संग्रामसिंह देशमुख म्हणाले .यावेळी आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले संग्रामसिंह देशमुख यांची कार्यकुशलता राज्यस्तरावरील नेत्यांच्या डोळ्यात भरली त्यामूळे त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे .आता तुम्ही फक्त अर्ज भरा बाकी सर्व जबाबदारी नेते आणि कार्यकर्ते सांभाळणार आहेत .असे आमदार शिवाजीराव नाईक यांनी सांगितले .
यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे , आमदार विलासराव जगताप ,गोपीचंद पडळकर ,भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड , यांनी मनोगत व्यक्त केले .यावेळी आटपाडी पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख ,भाजपचे तालुकाध्यक्ष हिम्मतराव देशमुख ,धनंजय देशमुख आदींसह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी ,नेते व कार्यकर्ते उपस्थित होते .
लोकसभेचे उमेदवार संजय काका पाटीलच : पृथ्वीराज देशमुख मीडियात काहीही उलट सुलट चर्चा असली तरी सांगली लोकसभा मतदारसंघात खासदार संजयकाका पाटील हेच लोकसभेचे उमेदवार असतील तर संग्रामसिंह देशमुख हेच पलूस कडेगाव मतदारसंघात विधानसभेचे उमेदवार असतील .आमचा पक्ष आमचे कुटुंब सुसंस्कृत आहे.त्यामुळे आम्ही एकविचाराने वाटचाल करणार भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले .
कॉंग्रेसमुक्त जिल्हा करण्याचा संकल्प : आमदार सुरेश खाडे जसा कॉंग्रेसमुक्त देश करण्याचा भाजपचा संकल्प आहे तसा कॉंग्रेसमुक्त जिल्ह्या करण्याचा संकल्पही जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी केला आहे . आता पलूस कडेगाव मतदारसंघातही कमळ फुलणार आहे असे आमदार सुरेश खाडे म्हणाले .
अण्णा आणि बाबा एकाच नाण्याच्या दोन बाजू :पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला पाठींबा दिला आहे याबाबत सूचक टोला लागवताना संग्रामसिंह देशमुख म्हणाले पृथ्वीराज (बाबा ) देशमुख आणि अरुण (आण्णा ) लाड हे एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत .