सांगली : कोणत्याही देशात खेळासाठी किती सुविधा उपलब्ध आहेत, यापेक्षा अंगात ऊर्मी अन् खेळाप्रति वेड असेल तर कोणताही खेळ आत्मसात करणे शक्य आहे. ज्यावेळी ही ऊर्जा तयार होईल तेव्हा क्रिकेटप्रेमी भारतही फुटबॉलमध्ये जागतिक स्तरावर चमकू शकतो, असे मत आंतरराष्ट्रीय फ्रीस्टाईल फुटबॉलर जेमी नाईट याने गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
तो म्हणाला की, फ्रीस्टाईल फुटबाॅल हा वेगळा खेळप्रकार आहे. यात अनेक कौशल्य आत्मसात करावी लागतात. प्रत्येक मोठा फुटबाॅलपटू हा फ्रीस्टाईल फुटबॉलर नसतो आणि फ्रीस्टाईल फुटबॉलर हा चांगला फुटबॉल खेळाडू नसतो. त्यामुळे लोकांत याबाबत गैरसमज असतात. दोन्ही खेळांचे कौशल्य भिन्न असते. तरीही मला दिग्गज फुटबॉलपटूंना पाहून हे कौशल्य आत्मसात करावेसे वाटले. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. दिवसांतले अनेक तास व अनेक दिवस यासाठी तयारी करावी लागली. ही कला कठीण असली तरी शक्य आहे. व्यावसायिक स्तरावर यासाठी मोठ्या संधी आहेत. भारतात जर कोणाला फ्रीस्टाईल फुटबॉलमध्ये करिअर करायचे असेल तर त्याला निश्चित संधी आहे. केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही यात भारतीय मुलांना मोठी संधी आहे.
वातावरण तयार झाले पाहिजे
तुमची लोकसंख्या किती आहे, तुमच्याकडे साधन, सुविधा किती आहेत, यापेक्षा खेळासाठी वातावरण किंवा त्याप्रति वेड कितपत आहे, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तसे वातावरण झाल्यास फुटबॉलसारख्या जगातील सर्वाधिक खेळल्या जाणाऱ्या क्रीडाप्रकारात कोणताही देश पुढे जाऊ शकतो, असे मतही त्याने मांडले.
भाकरीचा स्वाद मस्तचभारतीय खाद्यपदार्थ मला आवडतात. त्यातही सांगलीत आल्यानंतर भाकरी व चपाती खायला मिळाली. भाकरीचा स्वाद मला खूप आवडला, असे जेमी नाईटने सांगितले.
तयारी नेहमीच असते
सतत माझा सराव सुरू असतो. त्यामुळे जागतिक विक्रम साकारण्यापूर्वी विशेष अशी काही तयारी केली नाही. माझा नैसर्गिक खेळ मी केला अन्य त्याची नोंद घेतली गेली, असे नाईट म्हणाला.