सांगली : आमच्या परस्पर तालुक्यातील लोकांच्या निवडी होतात. पक्ष प्रवेश दिला जातो. ज्यांनी मागील निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले त्यांनाच प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते थेट प्रवेश दिला जातो. आमची भाजपला गरज नसेल तर आमचा मार्ग आम्हाला मोकळा आहे, अशा शब्दात भाजपचे नेते, माजी आमदार विलासराव जगताप यांनी पक्षाला इशारा दिला.भाजपच्या जिल्हा कोअर कमिटीची बैठक सोमवारी सांगलीत पार पडली. यावेळी निरीक्षक सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, आ. सुधीर गाडगीळ, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, दिपक शिंदे, पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते. जत तालुक्यात पक्षाने केलेल्या निवडींवर आक्षेप घेत माजी आमदार विलासराव जगताप यांनी या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली.लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जिल्हा निवडणूक प्रमुुख तसेच प्रत्येक तालुक्यात एका प्रमुखाची नियुक्ती केली आहे. जत तालुक्यात तम्मणगोडा रवी-पाटील यांची लोकसभा निवडणुकीसाठी तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीला जगताप यांनी जोरदार आक्षेप घेतला. मला न विचारता रवी-पाटील यांची निवड पक्षाने परस्पर का जाहीर केली अन्य तालुक्यात संबंधित आमदारांना विचारून निवडी झाल्या आहेत. जतमध्येच परस्पर निर्णय का घेतला, असा सवाल जगताप यांनी केला. हाळवणकर यांनी पक्षाने ही निवड केली असून याबाबत प्रदेश स्तरावरील नेत्यांशी बोलून चूक दुरुस्त करू, असे सांगितले. मात्र, याने जगताप यांचे समाधान झाले आहे.
नव्या अध्यक्षांवरही नाराजीजगताप यांनी नूतन जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावरही टीका केली. जतमध्ये वॉर रूमच्या उद्घाटनासाठी आल्यावर तुमच्या सत्कारासाठी आम्ही वाट पाहत नाक्यावर ताटकळत उभे होतो, मात्र तुम्ही आमची भेट घेण्याचे सौजन्यही पाळले नाहीत, अशा शब्दात जगताप यांनी नाराजी व्यक्त केली.