..तर आगामी सर्व निवडणुका शिवसेना स्वतंत्र लढेल, संजय विभुतेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 05:29 PM2023-04-04T17:29:44+5:302023-04-04T17:31:47+5:30
जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी आपापसातील जिरवाजिरवी बंद करावी
सांगली : काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये मोठ्या पदावर काम करणारे नेतेच एकमेकांवर कुरघोड्या करत आहेत. त्यांनी या तिरक्या चाली थांबविल्या नाहीत, तर बाजार समितीसह पुढील सर्व निवडणुका शिवसेना (ठाकरे गट) स्वतंत्रपणे लढवेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी एकसंध व मजबूत होत असताना जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर कुरघोड्या करत आहेत. भाजप आणि मिंधे गट हा आमचा मुख्य शत्रू आहे. जिल्ह्यात मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी तिरक्या चाली चालत आहे. त्यांनी ते बंद करावे. बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी करावी. अन्यथा जिल्ह्यात शिवसेना या दोन पक्षांसोबत कधीही जाणार नाही.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची जबाबदारी अधिक आहे. त्यांनीच यावर तोडगा काढावा. महाविकास आघाडी एकदिलाने लढली तर बाजार समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणुकांमध्ये भाजपला पराभूत करू शकतो. वेगळे लढलो तर भाजप आपल्याला संपवून टाकेल, असे स्पष्ट गणित आहे, असे ते म्हणाले.
तिन्ही नेत्यांनी जिरवाजिरवी बंद करावी
जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी एकदा ठरवून आपापसातील जिरवाजिरवी बंद करावी. अन्यथा आम्ही संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन किमान जिल्ह्यापुरते तरी स्वतंत्र लढू, असे विभूते म्हणाले.
क्षीरसागर क्षुल्लक
नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर विभूते यांनी टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, आम्हाला शिल्लक सेना म्हणणारे क्षीरसागर किती क्षुल्लक आहेत, हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल. ठाकरे कुटुंबाने त्यांना मानाची पदे दिले, आमदारकी दिली. ते खाल्ल्या घराचे वासे मोजत आहेत.