दत्ता पाटीलतासगाव : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पाटील व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे आदेश असतानाही लोकसभा निवडणुकीत मला मोठी मदत केली. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत तुमच्या पक्षाचा आमदार निवडणूक आणायचा आहे, अशी कोपरखळी खासदार विशाल पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना नाव न घेता मारली. याचवेळी रोहित पाटील यांना आमदार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.सावळज येथे शुक्रवारी पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत पाटील यांच्या अर्धपुतळा अनावरणप्रसंगी विशाल पाटील बोलत होते. सावर्डे येथील कार्यक्रमात विशाल पाटील यांनी ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे यांना समर्थन दिले होते. मात्र, आजच्या सावळज येथील कार्यक्रमात तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीबाबत खासदार पाटील यांनी रोहित यांना समर्थक देत भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे खासदारांच्या या मतदारसंघातील भूमिकेबाबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.ते म्हणाले, आर. आर. आबांच्या पश्चात ही जबाबदारी रोहित पाटील यांच्यावर पडली. त्यांनी केलेली मदत तुम्ही अध्यक्ष असल्यामुळे उघडपणे सांगता येत नाही. कारण तुमचे आदेश होते, महाविकास आघाडीचे काम केले पाहिजे. मात्र रोहित पाटील यांनी राज्यभर काटेकोरपणे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी काम केले. त्या व्यापात तुम्ही त्यांना गुंतविल्यामुळे त्यांना या ठिकाणी येता आले नाही. पण समर्थकांनी एक चांगला निर्णय घेतला आणि मला एक संधी दिली, असा टोला यावेळी खासदार पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांना लगावला.
अंजनीकर हे पद्माळकरांच्या मदतीला धावले..विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत जयंत पाटील यांना राजकीय कोपरखळ्या मारण्यास सुरुवात केली. साहेब, आता तुम्ही सगळ्यांनी दिल्लीला पाठवलं आहे. आम्हाला शेवटी का असेना दिल्लीला जायला संधी मिळाली. त्यामागे तासगावकरांचा आणि खास करून अंजनीकरांचा खूप मोठा सहभाग आहे. अंजनीकर हे पद्माळकरांच्या मदतीला प्रत्येक वेळी धावून येतात.