अविनाश कोळीमाझ्या प्रिय बाळांनो..प्रेमानं नेहमीच माझा ऊर भरलेला असला तरी पूर घेऊन सतत तुमच्या दारात येण्याचा नाईलाज झाला. दररोज उठून माझी पातळी पाहण्याची आज तुमच्यावर जी वेळ आली ती तुम्ही सोडलेल्या पातळीमुळेच ना? लेकरं कितीही वाईट वागली तरी आईचं काळीज त्यांना माफ करतंच; पण लेकरांनी आईचा गळाच घोटायचं ठरवलं तर मलाही बाप व्हावंच लागेल ना ! सहनशीलतेचा आता अंत होतोय, पण तरीही लेकरांनो वेळ गेलेली नाही. माझ्या गळ्याभोवतीचा फास तेवढा ढिला करा अन् पाहा मायेचा पाझर कसा फुटतो ते. मनातल्या या व्यथा मांडण्याचा हा शेवटचाच प्रयत्न. यापुढे संवाद साधायलाही काही उरणार नाही, असंच दिसतंय..
कुणी म्हणतं सह्याद्री रांगेतील महाबळेश्वरच्या कृष्णस्प्रिंग नावाच्या झऱ्यापासून उगम झाला म्हणून माझं नाव कृष्णा पडलं तर कुणी म्हणतं भगवान श्री कृष्णाच्या नावावरुन पडलं. नावाचं काहीही असलं तरी कृष्णाच्या गुणांचा पाझर माझ्यात फुटला. म्हणूनच तर वर्षानुवर्षे होणाऱ्या तुमच्या अनेक चुका मी माफ केल्या. अगदी शिशुपालासारखाच. आता माझा नाईलाज होतोय.निर्मळ मनाने मी तुमच्या घरात बागडली. हजारो वर्षांच्या निखळ संस्कृतीचे माेती तुमच्या अंगणात उधळले. शेतीशिवाराला हिरवाईचं दान दिलं. पिढ्यान्पिढ्या तुमच्या आरोग्याची काळजीही घेतली. वाढवलं, घडवलं अन् तृष्णेचा प्रश्न कधी निर्माण होऊ दिला नाही. इतकं दिल्यानंतर त्याची परतफेड म्हणून तुम्ही लेकरांनी मला काय दिलं? आईच्या पोटात मैला, रसायनं, प्लास्टिक, मृतदेहांची लक्तरं अन् बरंच काही घातलं.माझ्या आरोग्याची नाळ तुमच्या आरोग्याशी जोडली गेलीय हेही विसरलात. उरली सुरली कसर तुम्ही माझ्या गळ्याभोवती अतिक्रमणांचा फास आवळून पूर्ण केली. तुमच्या घरा-दारात कधी पाणी येऊ नये म्हणून नाले, ओढे, ओत या अवयवांच्या माध्यमातून मी तुम्हाला सुरक्षाकवच दिलं होतं. या अवयवांचे लचके तुम्ही तोडले. तुम्हाला वाचविण्यासाठी तयार केलेल्या वाटा तुम्हीच नष्ट केल्या. आता मला तुमच्या घरा-दारात नाचण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. शिशुपालासारखे तुम्ही चुकांची मर्यादा ओलांडण्याच्या दिशेने जात आहात. म्हणूनच पुराचे हे दुष्टचक्र फिरवावे लागले. माफ करा बाळांनो, पण यात माझा काहीच दोष नाही. तुम्हीच तुमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीय. अधू होऊन जगायचं नसेल तर अजूनही वेळ गेली नाही. आईचं काळीज म्हणून मी तुम्हाला चुका सुधारायची एक संधी देते. जमलं तर पहा. समृद्धीचा बहर आणायचा की मृत्यूचं द्वार खोलायचं, हे सारं तुमच्याच हाती आहे. बस्स..एवढंच सांगायचं हाेतं.
- तुमचीच आई.. कृष्णामाई