लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राज्यभर असलेला रक्ताचा तुटवडा व आरोग्य यंत्रणेच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनास प्रतिसाद देत गुरुवारी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात अधिकाऱ्यांनी रक्तदान करीत आपली सामाजिक बांधिलकी जपली. रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिरे आयोजित करण्यावर मर्यादा आल्याने रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाने रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यास विविध घटकांकडून प्रतिसादही मिळत होता. सोमवार (दि. १८) पासून जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. महिनाभर चालणाऱ्या या अभियानात वाहतुकीच्या नियमांच्या प्रबोधनाबरोबरच इतरही उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आरटीओ कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ३० जणांनी रक्तदान केले. पुढील महिनाभर असे सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत जाधव, संदीप पाटील, अमोल कोकरे, कोमल सलगर, अर्चना पवार, सुनील मुळे, आदींनी उपक्रमात सहभाग घेतला.