१४ नोव्हेंबर १९६६ रोजी रावसाहेबांचा जन्म मिरज तालुक्यातील हिंदकेसरी मारुती माने यांच्या कवठेपिरान या गावात शामराव कोरे म्हणजेच कोळी गुरुजी आणि लक्ष्मीबाई यांच्यापोटी झाला. बालपणापासूनच ते जिद्दी, खेळकर आणि परिश्रम घेणारे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कवठेपिरान जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण सांगलीतील आरवाडे हायस्कूल येथे झाले. औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून त्यांनी तंत्रशिक्षण पूर्ण केले. ४ जानेवारी १९८५ रोजी जलसंपदा विभागातील अधिकारी असलेले ज्येष्ठ बंधू उत्तमराव कोरे यांच्या मार्गदर्शनाने आणि स्वत:च्या हुशारीने ते जलसंपदा विभागात अनुरेखक पदावर रुजू झाले. प्रामाणिकपणे जबाबदारी पेलणाऱ्या रावसाहेबांनी पुढे सहायक आरेखक, आरेखक, प्रमुख आरेखक अशी पदोन्नती मिळवली. जलसंपदा विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी संघटनेची स्थापना केली. या संघटनेचे ते अध्यक्ष होते.
सन २००३ मध्ये जलसंपदा विभागातील बरीच पदे रद्द केली. तेव्हा लढवय्या बाणा असणाऱ्या रावसाहेब कोरे यांनी सरकार बरोबर संघर्ष करून हजारो सहकाऱ्यांना न्याय मिळवून दिला. लोकांच्या नोकऱ्या वाचविल्या. त्याचवेळी रावसाहेबांचे प्रमुख आरेखक पदही रद्दबातल ठरविण्यात आले आणि ३० ऑक्टोबर २००३ रोजी त्यांचे समावेशन राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षकपदी करण्यात आले. रावसाहेबांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. अवैध व्यावसायिकांचा कर्दनकाळ अशी ओळख त्यांनी निर्माण केली. शेकडो ठिकाणी छापे टाकून त्यांनी गावठी दारूच्या हातभट्टी उद्ध्वस्त केल्या. असे धडाकेबाज, ध्येयवादी अबकारी अधिकारी रावसाहेब कोरे म्हणजे सुपरहिरोच होते.
राज्य सरकारने आणि विभागाने त्यांचा वेळोवेळी सन्मानपत्रे आणि बक्षिसे देऊन त्यांचा गौरव केला. गुन्हेगारांना शिक्षा लावत असताना ती माणसं आहेत, हे रावसाहेब कोरे कधी विसरले नाहीत. म्हणूनच त्यांनी कायदेशीर नव्या अस्थापना सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देऊन व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करून अनेक उद्योजक तयार केले.
रावसाहेब कोरे यांनी सोलापूर व कोल्हापूर विभागात आपली कारकीर्द गाजविली होती. तरीही मध्यंतरी एक वर्षभर उत्पादन शुल्क विभागातून पुन्हा जलसंपदा विभागाकडे जबदरस्तीने त्यांना पाठविण्याचा प्रयत्न काही हितशत्रूंनी केला होता. प्रामाणिक सेवा करणाऱ्या व शासनाकडून अनेक मानपत्रे व बक्षिसांनी गौरविण्यात आलेल्या अधिकाऱ्यावर अशी वेळ येते. परंतु, या सगळ्याला त्यांनी वरिष्ठांचा आदर राखत न्यायीक मार्गाने अत्यंत धीरोदात्तपणे तोंड दिले.
ते पुन्हा राज्य उत्पादन शुल्क विभागात आपल्या कर्तव्यावर रुजू झाले. शेवटी त्यांची बदली नागपूर विभागात झाली. आपल्याला लोकसेवेचे काम करायचे आहे, ही त्यांची भावना असल्यामुळे कुठेही जाण्याची त्यांची तयारी होती. बदलीनंतर ते दुय्यम निरीक्षक पदावर नागपूर राज्य उत्पादन शुल्क विभागात रुजू झाले. काही काळातच त्यांची निरीक्षक पदावर पदोन्नती झाली. नागपूर विभागातही त्यांनी आपली कर्तव्यकुशलता दाखवून दिली. ६ सप्टेंबर २०१९ रोजी रावसाहेबांना राज्य उत्पादन शुल्क विभागात निरीक्षकपदी बढती मिळाली. तेव्हा विभागातील सर्वांनीच जल्लोष केला होता.
राज्यातील कोळी समाज संघटनेला त्यांचे नेहमीच सहकार्य असायचे. आपल्या समाजातील तरुणांनी उद्योजक झाले पाहिजे व्यवसाय, नोकरी केली पाहिजे. पण बेरोजगार युवक राहू नये असा रावसाहेबांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी जिल्हा उद्योग अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी रोजगार व उद्योग प्रशिक्षिण शिबिरे घेतली.
कुटुंबीयांवर आणि नातेवाईकांवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. आपल्या चार बहिणी, त्यांची मुलं, भाऊ या सर्वांशी त्यांचा जिव्हाळा होता. साहेब कामात कितीही व्यस्त असले, तरी कुटुंबीयांची ते काळजी घ्यायचे. पत्नी सुनीता, मुलगा अरुण, सून दीपाली, मुलगी मिनाली, जावई गजानन सांगले, नातवंडे शर्वरी, कोमल, आत्मज, आरव या सर्वांवर ते जीवापाड प्रेम करायचे.
असे म्हणतात चांगली माणस देवाला फार प्रिय असतात. ६ सप्टेंबर २०२० रोजी रावसाहेबांचे अल्पश: आजाराने त्यांचे निधन झाले. कोरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. साहेबांना अजून समाजासाठी खूप काही करायचे होते. पण नियतीपुढे सर्वांचेच हात थिटे पडतात. एक समाजशील, कुटुंबवत्सल, आदर्श व्यक्तिमत्त्व असणारे रावसाहेब कोरे आज आपल्यात नाहीत ही वेदना मनाला सलत राहते. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
- मोहनराव कोळी