सांगली : नंदिवाले समाजातील जातपंचायतींने कराड येथे घेतलेला निर्णय अमान्य करून आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांवरील सामाजिक बहिष्कार सुरू ठेवणार असल्याचे समाजातील काहींनी जाहीर केले. पलूस येथील झालेल्या या निर्णयाविरोधात इस्लामपूर येथील आंतरजातीय विवाह केलेले प्रकाश शंकर भोसले यांनी पलूस पोलीस स्टेशनमध्ये काल, शुक्रवारी (दि.१४) याप्रकरणी फिर्याद दाखल केली. या तक्रारीवरुन सहा पंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जातपंचायतीचे पंच - विलास शंकर भिंगार्डे, चंद्रकांत बापू पवार (दोघे रा. इस्लामपूर), शामराव श्रीरंग देशमुख, अशोक शंकर भोसले (दोघे रा. दुधोंडी), किसन रामा इंगवले (जुळेवाडी, ता. कराड), विलास बापू मोकाशी (नेहरूनगर, निमणी) या पंचांवर सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार पलूस पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला आहे. महाराष्ट्रातील नंदिवाले काशी कापडी या समाजातील काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केले आहेत. अशा अंदाजे 150 जोडप्यांना नंदिवाले जातपंचांनी समाजातून बहिष्कृत केले होते. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी नंदिवाले समाजातील जातपंचांशी संपर्क करून त्यांची मेढा (जि. सातारा) पोलीस स्टेशनमध्ये बैठक बोलावून त्यांची समजूत काढून बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली. तेव्हा पंचांनी सामाजिक बहिष्कार मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र काहींनी याला विरोध केला.याप्रकरणी काही पीडित जोडप्यांनी याविरोधात पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. यातील फिर्यादी प्रकाश भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहून जो सामाजिक बहिष्कार टाकला आहे. त्याच्या त्रासाची आपबीती पत्रकारांना सांगितली. सदर प्रकरणाचा पाठपुरावा करून गुन्हा नोंद करण्यासाठी सातारा अंनिसचे कार्यकर्ते शंकर कणसे, प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, वंदना माने, डॉ. दीपक माने, अॅड. हौसेराव धुमाळ, मोहसीन शेख यांचे बहुमोल सहकार्य झाले.गुन्हा नोंद करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पलूस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजश्री दुधाळ, हवलदार नितीन गोडे यांचे बहुमोल सहकार्य लाभले. पत्रकार परिषदेला सांगली अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात, फारूक गवंडी, डॉ. सविता अक्कोळे, बाबुराव जाधव, वासुदेव गुरव, त्रिशला शहा इत्यादी उपस्थित होते.