सांगली: अण्णा भाऊ साठे यांनी कष्टकरी, उपेक्षित समाजाच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडल्या. त्यांनी 34 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह आदि प्रकारच्या साहित्यातून समाजाचे प्रबोधन केले, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ आज झाला. यानिमित्त मिरजमधील बालगंधर्व नाट्यगृह येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सांगली - मिरज - कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर संगिता खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार विलासराव जगताप, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, डॉ. सुरेश खाडे यांच्या मातोश्री तानुबाई खाडे, सुविद्य पत्नी सुमन खाडे, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहाय्यक आयुक्त सचिन कवले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, दीपक शिंदे - म्हैसाळकर, मोहन व्हनखंडे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.प्रतिकूल परिस्थितीशी झगडा देत अण्णा भाऊ साठे यांनी फार मोठे साहित्य निर्माण केले. त्यांचे साहित्य कष्टकरी, गोरगरीब, श्रमजीवी समाजासाठी प्रबोधन करणारे ठरले असल्याचे सांगून सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सन 2019-20 हे वर्ष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने 100 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
जन्मशताब्दी वर्षानिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे प्रत्येक जिल्ह्यात स्मारक, स्मारक ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, अण्णा भाऊ साठे यांच्या मुंबईमधील वास्तव्याच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक, त्यांच्या चरित्रावर आधारित चित्रपट निर्मिती, जन्मगाव वाटेगावचा विकास, गरजूंना 25 हजार घरे, मातंग समाजातील उदयोन्मुख कलाकारांना वाद्य सामग्री वाटप आदि कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. या माध्यमातून त्यांची आठवण राहावी व इतरांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी, हा हेतू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी निधीची तरतूद उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी यावेळी ऋणनिर्देश व्यक्त केले.मिलिंद शंभरकर यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी वर्षभर करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. सुशीलाबाई घोडावत अंध विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बार्टीच्या वतीने प्रशिक्षण घेतलेल्या लोकसेवा आयोगाच्या यशस्वी परीक्षार्क्षींचा सत्कार करण्यात आला. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले. समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी आभार मानले. या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सांस्कृतिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाददरम्यान, अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित गायक आदर्श शिंदे यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या गीतांसह विविध गीते सादर केली.