कोकरुड : सद्य परिस्थितीत राज्यकर्त्यांनी सामान्य लोकांना जाती-जातीच्या राजकारणात गुंतविल्यामुळे आजचा समाज एकत्र येत नाही, ही भारताची फार मोठी शोकांतिका आहे, असे प्रतिपादन माजी आमदार, ज्येष्ठ कवी व वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी केले. शिराळा येथील यशवंत व्याख्यानमालेत ‘भारत कधी... कधी... माझा देश...’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वाळवा तालुका तहसीलदार वैशाली सरनोबत होत्या. रामदास फुटाणे म्हणाले की, जोपर्यंत गरिबांची मुले जिल्हा परिषदेच्या किंवा महापालिकेच्या शाळेत शिकत आहेत, तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही. श्रीमंतांची व मध्यमवर्गीयांची मुले इंग्रजी माध्यमामध्ये शिकत आहेत. त्यामुळे मराठी भाषेचा बळी देऊन इंग्रजी भाषा घरात घुसत आहे. इंग्रजी जगाची संपर्क भाषा आहे. ती भाषा आली पाहिजे. नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांना इंग्रजी आले पाहिजे. परंतु आजी, आजोबा, आई, अण्णा, काका, मामा, बापू हे जिव्हाळ्याचे शब्द घरामध्ये टिकले पाहिजेत. आपल्याला ज्ञानोबांचा, तुकारामांचा, शिवबांचा महाराष्ट्र घेऊन परदेशामध्ये जायचे आहे, अशी मानसिकता आजच्या युवकांमध्ये असली पाहिजे. देशामध्ये जी अर्थव्यवस्था चालली आहे, त्यामध्ये मोठी तफावत आहे. ती कोणासाठी आहे हेच समजत नाही. काळ बदलला तरी वर्षानुवर्षे शेतकरी मात्र चार-पाच हजारावरच राबत आहे. यामध्ये दिवसातून दोन तास कष्ट घेऊन लाखो रुपयांचे काम करणाऱ्यांमध्ये कधी तरी संघर्ष होणार, हे निश्चित आहे. यावेळी शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक, सिनेअभिनेते विलास रकटे, जि. प. सदस्य रणधीर नाईक, सुखदेव पाटील, सतीश पाटील, महेश पाटील, उत्तम निकम, विजयराव यादव, अजिंक्य कुंभार उपस्थित होते. (वार्ताहर)
समाज एकत्र नाही, ही देशाची शोकांतिका
By admin | Published: January 18, 2016 11:16 PM