सांगली : जुनी मोटार नवीन असल्याचे भासवून विकत ग्राहकाची फसवणूक केल्याबद्दल प्रकाश ऑटो प्रा. लि. उल्हासनगर (जि. ठाणे) यांनी ग्राहकाला ६ लाख रुपये भरपाई म्हणून देण्याचे आदेश येथील ग्राहक मंचाने दिले.तासगाव येथील अमोल अशोक भंडारे हे उल्हासनगर येथे राहण्यास होते. त्यांनी प्रकाश ऑटोमधून २०१५ मध्ये मोटार खरेदी केली होती. त्यासाठी ४ लाख ५३ हजार २९२ रुपये भरले होते. गाडी घेतल्यानंतर तिला पिकअप नाही, मायलेज मिळत नाही, गाडीची कार्यक्षमता चांगली नाही या गोष्टी लक्षात आल्या. याबाबत भंडारे यांनी प्रकाश ऑटोकडे तक्रारी केल्या असता तुमची गाडी नवीन आहे. पिकअप यायला वेळ लागेल अशी कारणे सांगण्यात आली. या काळात गाडी दुरुस्तीसाठी त्यांनी दोन लाख रुपये खर्च केले.यादरम्यान कोरोनामुळे भंडारे उल्हासनगर येथून मूळ गावी तासगावला आले. पैशांची गरज असल्याने गाडी विकण्याचे ठरविले. सांगली येथे मोटार कंपनीच्या शोरुममध्ये गाडी दाखविली असता २०१५ मध्ये तिचा अपघात झाल्याचे वितरकाने सांगितले. भंडारे यांनी गाडी खरेदी करण्यापूर्वी म्हणजे मे २०१५ मध्ये अपघात झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी सांगली येथील ग्राहक मंचाकडे प्रकाश ऑटोविरुद्ध तक्रार दाखल केली.
३० दिवसांत ६ लाख रुपये द्याप्रकाश ऑटो यांनी ग्राहकाला सदोष सेवा दिल्याचे सुनावणीदरम्यान शाबित झाले. भंडारे यांनी गाडीसाठी भरलेले ४ लाख ५३ हजार २९२ रुपये व त्यावर नऊ टक्के दराने व्याज, गाडी दुरुस्तीसाठीचा खर्च म्हणून ५० हजार रुपये तसेच शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल एक लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले. सुमारे सहा लाख रुपयांची ही भरपाई ३० दिवसांत देण्याचे आदेश मंचाचे अध्यक्ष प्रमोद गोकुळ गिरीगोस्वामी व सदस्य अशफाक नायकवडी, मनीषा वनमोरे यांनी दिले.