फोटो - ०९०३२०२१-आयएसएलएम- राजकीय न्यूज
अतुल भाेसले, इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर असलेली सहकार पॅनलची सत्ता उलथवून टाकण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीमधील काही नेते सरसावले आहेत. याला भाजपचे आणि सहकार पॅनलचे सेनापती डॉ. अतुल भाेसले यांनी पेठ (ता. वाळवा) येथील बैठकीत सडेतोड उत्तर दिले. या बैठकीचे नियोजन राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांनीच केले होते.
कोरोना महामारीचे अडथळे पार करीत रयत पॅनलचे डॉ. इंद्रजित मोहिते एकाकी प्रचार करत आहेत. नेहमी प्रचारची धुरा सांभाळणारे कृष्णेचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांनी ‘रयत’चा नाद सोडला आहे. त्यामुळे कऱ्हाड आणि वाळवा तालुक्यातून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडून रसद मिळवण्यासाठी डॉ. मोहिते यांनी सोशल मीडियावर आपल्या प्रचाराचा नारळच फोडला आहे; परंतु संस्थापक पॅनलचे अविनाश मोहिते हे राष्ट्रवादीमध्ये अगोदरच डेरेदाखल आहेत. त्यात सहकार पॅनलमध्ये बहुसंख्य संचालक राष्ट्रवादीचे आहेत. परिणामी, आगामी निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढे तटस्थ भूमिका हाच पर्याय असल्याचे दिसते.
डॉ. इंद्रजित मोहिते यांनी रयत पॅनलचा जाहीरनामा सोशल मीडियावर जाहीर केला आहे. यामध्ये प्रामुुख्याने सहकार चळवळ, सभासदांना मालकी हक्क, खुले सभासद आदी मुद्दे आहेत, तर सत्ताधारी सहकार पॅनल हे सहकार चळवळ मोडीत काढत कृष्णेचे खासगीकरण करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप डॉ. इंद्रजित मोहिते यांनी केला आहे. संस्थापक पॅनलचे अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी राष्ट्रवादीची ताकद मिळविण्यासाठी वरिष्ठ नेत्याकडे धाव घेतल्याचे समजते.
सत्ताधारी सहकार पॅनलचे स्टार प्रचारक डॉ. अतुल भाेसले यांनी वाळवा तालुक्यातील ग्रामीण भागात बैठका सुरू केल्या आहेत. याचे नियोजन राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहेत. पेठ येथील बैठकीचे नियाेजन इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय पाटील यांनी केले. या बैठकीत अतुल भाेसले यांनी डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांनी सत्तेत असताना काय दिवे लावले, असा सवाल उपस्थित करत प्रचाराची तोफ डागली आहे. त्यामुळे आगामी काळात निवडणुकीअगोदरच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.