सांगली : घरपट्टीचे मूल्यांकन कमी करण्यासाठी लाच घेताना रंगेहात पकडलेला महापालिकेचा शिपाई बापू हुबाले याच्यावर आज आयुक्त अजिज कारचे यांनी निलंबनाची कारवाई केली. दरम्यान, काल मिरजेतील एक शिपाई लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. संशयित बापू हुबाले हा घरपट्टी विभागात शिपाई म्हणून नियुक्तीस आहे. घराचे निर्धारण कमी करून देण्यासाठी हुबाले फिर्यादीला भेटला होता. त्यावेळी हुबालेने त्यांच्याकडे साडेआठ हजार रुपये लाच मागितली. चर्चेअंती साडेचार हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. चांदणी चौकातील एका हॉटेलमध्ये हुबाले याने साडेचार हजार रुपयांची लाच स्वीकारताच, लाचलुचपतच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत व विश्रामबाग पोलिसांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर आज आयुक्त अजिज कारचे यांनी निलंबनाची कारवाई केली. मिरजेत महापालिका नगररचना विभागातील शिपाई विजयंत शंकर पडूळकर (वय ३२, रा. सिध्देश्वर सोसायटी, जुना कुपवाड रोड सांगली) व त्याचा हस्तक विनायक सुरेश मोरे (२५, रा. मंगळवार पेठ मिरज) यांना एक हजार रूपयांची लाच घेताना काल, बुधवारी सांगली लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. शिपाई पडूळकर याने तातडीने नकाशा देण्यासाठी एक हजार रूपये लाच मागितली होती. या कारवाईचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शिपाई निलंबित, एकाची प्रतीक्षा!
By admin | Published: October 09, 2014 10:02 PM