सांगली : ‘घनकचरा व्यवस्थापन व सांडपाण्याची विल्हेवाट’ या विषयावर शासनाने राष्ट्रीय लघुपट निर्मिती स्पर्धा आयोजित केली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतहोत्सवानिमित्त केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने आयोजन केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
स्पर्धकांनी दोन गटांत भाग घ्यायचा आहे. लघुपट यू ट्युबवर अपलोड करून त्याची लिंक शासनाच्या माय गव्हर्न्मेन्ट संकेतस्थळावर २० जुलैपर्यंत पाठवायची आहे. पहिल्या गटाचे विषय असे : जैव विघटनशील कचरा व्यवस्थापन, गोवर्धन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन, वर्तणूक बदल. या गटात पहिली तीन बक्षिसे १ लाख ६० हजार रुपये, ६० हजार रुपये आणि ३० हजार रुपये अशी आहेत.
दुसऱ्या गटात वाळवंट क्षेत्र, डोंगराळ प्रदेश, सागरी किनारपट्टीलगतचा प्रदेश, मैदानी भाग, पूरप्रवणक्षेत्र असे विषय आहेत. त्यासाठी दोन लाख, एक लाख २० हजार रुपये आणि ८० हजार रुपये अशी पहिली तीन बक्षिसे आहेत. १० वर्षांवरील भारतीय स्पर्धेत भाग घेऊ शकतात. ग्रामपंचायत, बचत गट, स्वयंसेवी संस्था, समुदाय आधारित संस्थांनाही भाग घेता येईल. लघुपट १ ते ५ मिनिटांचा आवश्यक आहे. ग्रामीण भागातील वातावरण टिपणारे लघुपटच स्वीकारले जाणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव यांनी केले आहे.