कवठेमहांकाळ : पुतळ्यांची उंची वाढविण्यापेक्षा भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे ओरखडे वात्रटीकेमधून शासनावर ओढत, साहित्य संमेलनातून लाल रक्ताची माणसे तयार झाली, तरच या देशात सामाजिक परिवर्तन होईल, असे मत लोकजागर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.हिंगणगाव येथे रविवारी चौथे लोकजागर साहित्य संमेलन पार पडले. यावेळी संमेलनाध्यक्ष रामदास फुटाणे यांनी शासनाच्या धोरणावर, जातीयवादावर निशाणा साधला. ते म्हणाले, पुतळ्यावर तीन हजार कोटी घालण्यापेक्षा पाणी, वीज, बेरोजगारीसाठी ३० हजार कोटी घाला, देश प्रगतिपथावर जाईल. तसेच तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळावे. तरच बेरोजगारी कमी होईल. जोपर्यंत दाखल्यावरची जात जात नाही, तोपर्यंत जातनिर्मूलन होणार नाही, असेही फुटाणे म्हणाले.स्वागताध्यक्ष डॉ. भीमराव कोळेकर म्हणाले, आजच्या तरुणाईने वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. वाचनामुळे समाज वैचारिकदृष्ट्या सुदृढ बनतो. तसेच नवनिर्मितीसुद्धा वाचनामुळेच होते.संमेलनाचे उद्घाटक मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत म्हणाले, ग्रामीण भागातून होणारी साहित्य संमेलने ही विचारमंथन करणारी संमेलने असून, परिवर्तनाची वैचारिक दिशा यामधूनच ठरते. ही साहित्य संमेलने समाजाचा आरसा आहेत.दरम्यान, सकाळी गावातून ढोलताशांच्या गजरात, वाजत-गाजत ग्रंथदिंडी काढण्यात आली. संमेलनाची सुरुवात तुळशीच्या रोपाला मान्यवरांच्याहस्ते पाणी घालून करण्यात आली. संमेलनाध्यक्ष रामदास फुटाणे, उद्घाटक अभिजित राऊत यांचा आम्ही हिंगणगावकर परिवारामार्फत मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सकाळच्या सत्रात उद्घाटनानंतर डॉ. भारती पाटील यांचे ‘सखी’ या विषयावर व्याख्यान पार पडले.दुपारच्या सत्रात कवी गोविंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन पार पडले. यामध्ये कवी रमजान मुल्ला, ज्योती बने, हणमंत शिंदे, गोपाळ पाटील, सुरेखा कांबळे, दयासागर बने, मनीषा पाटील यांनी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कथाकार जयवंत आवटी यांचे ‘सरपंच’ या विषयावर कथाकथन झाले.यावेळी नवनाथ गोरे, भीमराव धळूबुळू, तहसीलदार शिल्पा ठोकडे, अजितराव घोरपडे, जयसिंगराव शेंडगे, गजानन कोठावळे, आशाताई पाटील, गीतांजली माळी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलन पार पाडण्यासाठी आम्ही हिंगणगावकर ग्रुपचे कॅप्टन वसंत शेजाळ, प्रा. अनिल पाटील, प्रा. प्रकाश घड्याळे, सचिन चौगुले, सुनील पाटील, नाना शेजाळ, गौसमहंमद मुजावर यांनी परिश्रम घेतले.‘मी टू’ काही नवीन नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राफेल घोटाळ्यावरून देशात राळ उठली आहे. मोदींच्या सांगण्यावरून मीडियाने राफेल घोटाळ्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी हे चर्चेचे गुºहाळ बाहेर काढल्याची बोचरी टीकाही रामदास फुटाणे यांनी यावेळी भाजपचे नाव न घेता केली.
पुतळ्यापेक्षा भाकरीचा प्रश्न सोडवा: रामदास फुटाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:25 PM