लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील पेठभाग, सराफ कट्टा, हरभट रोड, मारुती रोड या प्रमुख बाजारपेठांमधील पार्किंगचा प्रश्न सोडवून कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपच्यावतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली.
भाजपचे सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष विशाल पवार, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, भारती दिगडे, केदार खाडिलकर, प्रशांत चिपळूणकर, मोहन जामदार, दीपक कर्वे, प्रकाश बिरजे यांनी उपायुक्तांकडे निवेदन सादर केले. यात म्हटले आहे की, सांगली शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवसेंदिवस पार्किंग समस्या गंभीर होत असून, यावर महापालिकेकडून उपाययोजना होणे गरजेचे आहे. भावे नाट्य मंदिरसमोरील महापालिकेचे पार्किंग हे दुचाकींसाठी खुले करावे. आनंद चित्रमंदिरमागे मारुती रोडवरील असलेले महापालिकेचे पार्किंग हे चारचाकींसाठी खुले करावे. याठिकाणी सोयी-सुविधाही उपलब्ध कराव्यात. संबंधित विभागास तसे निर्देश देण्यात यावेत. गणपती मंदिराशेजारी असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया यांना त्यांचे पार्किंग तत्काळ खुले करण्याची सूचना द्यावी. यामुळे थोडासा तरी पार्किंगवरचा ताण कमी होण्यास मदत होईल.