जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्यानी यांनी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना निवेदन दिले. यावेळी नगरसेवक अर्जुन माने उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : शहरातील चितारे कॉलनीमध्ये मोठ्या संख्येने कोट्यवधी रुपयांची हॉस्पिटल्स उभारण्यात आली आहेत. या परिसरात सांडपाणी साचून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेने रस्ते व गटारी तातडीने कराव्यात, अशी मागणी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्यानी यांनी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्याकडे केली आहे.
येथील चितारे कॉलनीत ऐश्वर्या पेट्रोलपंपापाठीमागील बाजूला परिसरातील सांडपाणी साचलेले आहे. या ठिकाणी पाणी साचल्याने दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. डेंग्यू व मलेरिया साथीचे रोग वाढत आहेत. त्यातच कोरोनाची दुसरी लाट येत आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने या परिसरातील सांडपाण्याची समस्या सोडवावी, रस्ते व गटारी कराव्यात. या मागण्या मान्य न झाल्यास पालिकेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिलीप वग्यानी यांनी दिला आहे. याबाबत नगराध्यक्ष स्नेहा माळी, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले आहे.