सांगली : चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अजूनही कायम असून, त्यांचे पुनर्वसन होत असताना कोणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याची सूचना आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी केली. चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आमदार पाटील बोलत होते. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यावेळी उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले, चांदोली अभयारण्यासाठी जमिनी गेलेले प्रकल्पग्रस्त अनेक वर्षांपासून शासकीय लाभापासून वंचित आहेत. त्यांना पुनर्वसनासाठी दिलेल्या जमिनीचे हस्तांतरणही अजून झालेले नसल्याने, प्रशासनाने तातडीने यावर कार्यवाही करावी व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करावे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चांदोली अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांचे संकलन सध्या सुरु असून त्यात त्रुटी आहेत. त्या दुरुस्त करुन भूमिहीनांचे संकलन करणे गरजेचे आहे. प्रत्येक वसाहतीमध्ये काही खातेदारांना भूखंड वाटप करण्याचे काम अजून बाकी असून त्यासाठी सर्व्हे करुन वाढीव भूखंड मंजूर करण्यात यावा. आष्टा येथील ११० एकर वनजमीन संपादनाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून गेली चार वर्षे याबाबत कार्यवाही झाली नसल्याने प्रशासनाने हा प्रश्न निकाली काढावा. शासनाच्या गायरान जमिनी व कवठेपिरान येथील पांजरपोळ जमिनीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत, यासह कें द्र शासनाच्या निर्णयानुसार ज्या कुटुंबातील व्यक्तीस शासकीय नोकरी मिळाली नाही, तर त्यास पाच लाख रुपये देण्याचे मान्य करण्यात आले असले तरी, त्याचा लाभ होत नसल्याने, ही रक्कम देण्याची कार्यवाही करण्यासह इतर मागण्यांचे निवेदनही यावेळी किसन मलप, पांडुरंग पाटील, तानाजी सावंत, धावजी अनुसे, शंकर सावंत, गणपती पाटील आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण साळोखे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चांदोलीतील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवा
By admin | Published: December 07, 2015 11:39 PM