इस्लामपूर मतदारसंघातून विधान परिषदेसाठी फिल्डिंग; भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 04:06 PM2024-11-29T16:06:00+5:302024-11-29T16:34:19+5:30
त्याअगोदरच रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली
अशोक पाटील
इस्लामपूर : जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या समर्थकांवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. दुसरीकडे मात्र भाजप आणि राष्ट्रवादीतील काही नेते विधान परिषदेवर जाण्यासाठी आक्रमक झाले आहेत. इच्छुक नेत्यांनी आपल्या मुंबई वाऱ्या वाढविल्या आहेत. भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याकडे आमदारकीची फिल्डिंग लावली आहे.
विधानसभा निवडणुकीत निशिकांत पाटील यांनी थेट आ. जयंत पाटील यांच्यापुढे आव्हान उभे केले. याचाच सारासार विचार करता निशिकांत पाटील यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी त्यांच्या समर्थकांकडून प्रयत्न केले जात असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. या उलट अजित पवार यांचे स्नेही राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष केदार पाटील आणि एन. डी. शुगरचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांनी यापूर्वीच विधान परिषदेसाठी अजित पवार यांच्याकडे साकडे घातले होते.
दत्ताजीराव पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघात शैक्षणिक संस्था आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एन. डी. शुगर औद्योगिक कारखाना उभा केला आहे. याला केदार पाटील यांची साथ आहे. २०१४ साली पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवार म्हणून दत्ताजीराव पाटील यांच्या नावाची चर्चा अजित पवार यांच्या गटात होती; परंतु सारंग पाटील यांचे नाव पुढे आले. त्यामुळे अरुणअण्णा लाड यांनी बंडखोरी केली. लढतीमध्ये भाजपचे चंद्रकांतदादा पाटील निवडून आले. तेव्हापासून दत्ताजीराव पाटील अजित पवार गटातून कार्यरत आहेत. त्यांच्याबरोबर वाळवा तालुकाध्यक्ष केदार पाटीलही सक्रिय आहेत. एकंदरीत सध्या तरी इस्लामपूर मतदारसंघातून विधान परिषदेसाठी नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे.
घड्याळाची मुसंडी
जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात भाजप आणि राष्ट्रवादीने मुसंडी मारली आहे. शिराळा मतदारसंघातून सम्राट महाडिक, तर इस्लामपूर मतदारसंघातून तिघेजण विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक आहेत. त्याअगोदरच रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली आहे.
अजित पवार यांचे आम्ही कट्टर समर्थक आहोत. केदार पाटील यांच्यावर तालुक्याची जबाबदारी दिली. २०१४ साली मला पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळणार होती. झालेल्या विधानसभा निवडणुकीत केदार पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर होते. वरिष्ठ पातळीवरून निशिकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे विधान परिषदेवर मला किंवा केदार पाटील यांनाच संधी मिळावी, अशी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. - दत्ताजीराव पाटील, अध्यक्ष, एन. डी. शुगर इस्लामपूर.