दत्ता पाटीलतासगाव : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि जिल्ह्यातही महायुतीत ''मिले सूर मेरा तुम्हारा'' अशी परिस्थिती आहे. याच सुरात सूर मिसळून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी खानापूर-आटपाडी विधानसभेचा बालेकिल्ला भक्कम करण्यासाठी विसापूर मंडलामध्ये हालचाली सुरू केल्या आहेत. इथल्या भाजपच्या काही कारभाऱ्यांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी गळ टाकला असून पक्षप्रवेशाचा निर्णय अंतिम झाला असल्याची चर्चा आहे.राष्ट्रवादीच्या फुटीनंतर वैभव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश करून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद मिळवले. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात पक्ष बांधणी सुरू केली आहे. जिल्ह्यात विस्तार करत असतानाच त्यांच्या अजेंड्यावर खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघ असल्याचे दिसून येत आहे. खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात विसापूर सर्कलमधील २१ गावांचा समावेश आहे. प्रत्येकवेळी विधानसभा निवडणुकीत ही २१ गावे निर्णायक ठरल्याचा इतिहास आहे. त्यामुळे खानापूरच्या नेत्यांचे या २१ गावांवर नेहमीच लक्ष राहिले आहे.महायुतीत सहभागी झाल्यापासून वैभव पाटील आणि खासदार संजय पाटील यांची सलगी वाढली आहे. त्यामुळे खासदार पाटील यांचे कार्यकर्ते देखील वैभव पाटील यांच्या संपर्कात आले आहेत. मात्र केवळ महायुतीच्या अजेंड्यावरच समाधान न मानता वैभव पाटील यांनी विसापूर मंडलामधील भाजपच्या काही कारभाऱ्यांना राष्ट्रवादीत निमंत्रण दिल्याची चर्चा आहे. भाजपमध्ये घुसमट होत असलेले काही पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
तालुकाध्यक्षपद रिक्ततासगाव तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर वायफळेचे साहेबराव पाटील यांना जिल्हा उपाध्यक्षपद देण्यात आले. मात्र अद्याप तालुकाध्यक्षपद रिक्त आहे. विसापूर मंडलामधील भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यास तालुकाध्यक्षपद देण्यासाठीच हे पद रिक्त ठेवण्यात आले असल्याची चर्चा आहे.
प्रवेश निश्चित, पण मुहूर्त ठरेनाभाजपचे काही पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. पण त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. लोकसभा निवडणुकीनंतरच पक्षप्रवेश करण्याबाबत खलबते सुरू असल्याची चर्चा आहे.