महाआघाडी सरकारवर काही सत्ताधारी आमदारच नाराज, तर काही समाधानी; सांगली जिल्ह्यातील स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 05:15 PM2022-06-17T17:15:43+5:302022-06-17T17:26:51+5:30
एकीकडे सरकारच्या कामगिरीवर विरोधी पक्षाचे आमदार टीका करीत असताना आता सत्ताधारी आमदारांनीही तसाच सूर ओढण्यास सुरुवात केली आहे.
सांगली : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे होत आली आहेत. या सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसच्या आमदारांमध्ये सरकारच्या कामकाजावरुन समन्वय नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे, मात्र सत्ताधारी आमदारच सरकारच्या कामगिरीवर खूश नसल्याची बाब समोर येत आहे. आमदारांच्या मतदारसंघातील कामे होत नसल्याच्या तक्रारी प्रामुख्याने केल्या जात आहेत.
सांगली जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष मानला जातो. त्यानंतर काँग्रेस, भाजप व शिवसेनेचा क्रमांक लागतो. जिल्ह्यात अपक्ष एकही आमदार नाही. एकीकडे सरकारच्या कामगिरीवर विरोधी पक्षाचे आमदार टीका करीत असताना आता सत्ताधारी आमदारांनीही तसाच सूर ओढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातही अशीच स्थिती दिसते.
सरकारच्या कामगिरीवर सत्ताधारी आमदार समाधानी आहेत का?
काँग्रेस
विश्वजित कदम : कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी मतदारसंघाला विकासाचे रोल मॉडेल केल्याचे सांगितले आहे.
विक्रम सावंत : मतदारसंघातील कामे प्राधान्याने व्हायला हवीत. येथील पाणीप्रश्न महत्त्वाचा असल्याने त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. प्रतिव्यक्ती जमीनधारणेत सर्वात मोठा तालुका असूनही जतच्या योजनांकडे दुर्लक्ष होत आहे, असे सावंत म्हणाले.
राष्ट्रवादी
जयंत पाटील : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
मानसिंगराव नाईक : शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की, तालुक्यातील सर्व महत्त्वाची कामे महाविकास आघाडी सरकारमुळे मार्गी लागली आहेत. मतदारसंघातील कामे प्राधान्याने पूर्ण झाली. कुठेही अडचणी आल्या नाहीत.
सुमनताई पाटील : राज्य सरकारच्या एकूणच कामगिरीबाबत मी समाधानी आहे. आम्ही सुचविलेली अनेक कामे मंजूर होतात, असे तासगाव-कवठेमहांकाळच्या आ. सुमनताई पाटील यांनी सांगितले.
शिवसेना
अनिल बाबर : खानापूर मतदारसंघातील कामे होत नसल्याबाबत बाबर यांनी पक्षीय नेत्यांकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र याबाबत त्यांनी मत व्यक्त केले नाही.
नेमक्या काय आहेत तक्रारी...
- प्रस्ताव पडून : शिवसेना, काँग्रेस हे मित्रपक्ष असूनही त्यांच्या आमदारांनी दिलेले प्रस्ताव शासनदरबारी तसेच पडून आहेत.
- कुरघोड्यांचे राजकारण : मित्रपक्ष असूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून कुरघोड्या केल्या जात असल्याचे शिवसेना, काँग्रेस पदाधिकारी सांगतात.
- श्रेय लाटले जाते : एखादे काम शिवसेना, काँग्रेस आमदारांनी केले, तर त्याचे श्रेय राष्ट्रवादीचे लोक घेत आहेत.