लोकमत न्यूज नेटवर्क
संख : लग्न करुन देत नाही तसेच बाहेरगावी जाण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणातून आसंगी (ता. जत) येथे मुलाने बापाचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केला. देवाप्पा खिराप्पा मोडे (वय ५५) असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेबारा वाजता घडली. प्रवीण मोडे (वय २६) असे संशयिताचे नाव आहे. उमदी पोलिसांनी रात्रीच त्याला ताब्यात घेेेतले.
आसंगी येथील देवाप्पा मोडे हे गावात पत्नी, मुलगा प्रवीणसोबत राहात होते. त्यांना तीन मुले आहेत. दोन मुले बाहेरगावी नोकरीला आहेत. प्रवीणचे लग्न झालेले नाही. वडील आपले लग्न करुन देत नाहीत तसेच बाहेरगावी जाण्यास पैसे देत नाहीत, या कारणातून बुधवारी रात्री प्रवीणचा वडिलांसोबत वाद झाला. हा वाद वाढत गेला आणि प्रवीणने आई कस्तुरा यांच्यासमोर वडिलांवर चाकूने सपासप वार केले. नंतर काठीने मारहाण केली. यावेळी कस्तुरा यांनी आरडाओरडा केल्याने त्यांचा आवाज ऐकून शेजारी राहणारे चुलते मधुकर, रखमाजी हे भांडण सोडवायला गेले. मात्र, त्यांनाही प्रवीणने चाकूचा धाक दाखवला. मधुकर यांना काठीने मारहाण केली. या घटनेची माहिती ग्रामस्थांना समजताच प्रवीण घाबरुन घरात दरवाजाला कडी लावून लपून बसला.
देवाप्पा मोडे यांना ग्रामस्थांनी उपचारासाठी रुग्णालयात नेले; पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस रात्री एक वाजता घटनास्थळी दाखल झाले. संशयित प्रवीणला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी सकाळी जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास उमदीचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव दांडगे करत आहेत.
चाैकट
मानसिक तणाव
संशयित आरोपी प्रवीण मोडे हा पदवीधर असून, तो सध्या बेरोजगार आहे. घरात त्याने लग्न करुन द्या म्हणून तगादा लावला होता; पण लग्न जमत नसल्याने तो तणावात असल्याची चर्चा घटनास्थळी होती.