शिरटे : काही लोक कर्तव्याच्याही पुढे जाऊन समाजासाठी आपण काही तरी देणे लागतो, या भावनेतून जनसेवेसाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. अशाच संवेदनशील लोकांपैकी एक म्हणजे येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील क्रांतिसिंहांच्या भूमीतील सुपुत्र शंकर गोडसे. त्यांनी पांडुरंग गवळी यांना रात्री १२ वाजता प्लाझ्मा दान करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
अंगापूर (जि. सातारा) येथील माजी सरपंच आणि सध्याचे तंटामुक्तीचे अध्यक्ष पांडुरंग गवळी यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिवसेंदिवस प्रकृती खालावू लागल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना प्लाझ्मा आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांचा रक्तगट एबी पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांना सर्वत्र चौकशी करूनही प्लाझ्मा उपलब्ध झाला नाही. यावेळी त्यांच्या कुटुंबातील लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले.
सातारा पोलीस दलाच्या बॉम्ब स्कॉड पथकातील कर्मचारी अमोल गवळी यांनी याबाबतची पोस्ट फॉरवर्ड केली. यावेळी या ग्रुपमधील शंकर गोडसे यांनी त्वरित त्या क्रमांकाशी संपर्क साधत प्लाझ्मा दान करण्यास तयार असल्याचे सांगितले.
शंकर गोडसे यांनी क्षणाचाही विलंब न करता साताऱ्याकडे धाव घेतली. गोडसे यांचा प्लाझ्मा नमुना तपासणी करण्यात आला. रात्री साडेबारा वाजता प्लाझ्मा जुळत असल्याचे डॉक्टरांनी कळवले. लगेचच वेळ न दवडता गोडसे यांनी प्लाझ्मा दान केला आणि तो पांडुरंग गवळी यांना पुढील उपचारासाठी वापरण्यात आला. शंकर गोडसे हे काही महिन्यांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. कोरोनावर मात करून ते सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले होते. क्रांतिसिंहांचा वसा आणि विचार जपणाऱ्या गोडसे यांनी क्षणाचाही विलंब न करता साताऱ्याकडे धाव घेत एका सामाजिक कार्यकर्त्याचे प्राण वाचवले. पांडुरंग गवळी यांनीही कोरोना काळात खूप चांगली कामगिरी केली असून, गावच्या विकासात त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. पांडुरंगाच्या मदतीला शंकर धावून गेल्यामुळे अनेकांनी गोडसे यांचे अभिनंदन केले.