- सदानंद औंधेलोकमत न्यूज नेटवर्कमिरज (जि. सांगली) : जन्मजात मूकबधिर असलेल्या दाम्पत्यांना जन्मजात गरिबीची दाहकताही मिळाली. तरीही मुलाच्या माध्यमातून त्यांनी आनंदाच्या वाटा शोधल्या. त्याच्या आशेवर कष्ट उपसले. मुलानेही त्यांच्या कष्टाची जाण ठेवत शिक्षणात कष्ट घेतले आणि वयाच्या २८ व्या वर्षी त्याने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. कळंबी (ता. मिरज) येथील शैलेश चवगोंडा पाटील याने स्पर्धा परीक्षेत राज्यात ४१ वा क्रमांक मिळवून जलसंपदा विभागात सहायक अभियंतापदाला गवसणी घातली.
शैलेशचे वडील चवगोंडा बापूसोा पाटील व आई ललिता दोघेही जन्मत:च मूकबधिर. घरी केवळ एकरभर शेती असल्याने ते शेतमजुरी करतात. शैलेशची आई कपडे शिवून संसाराला हातभार लावतात. प्रतिकूल परिस्थितीसमोर हतबल न होता दाम्पत्याने दोन्ही मुलांना पदवीपर्यंत शिकविले.
शैलेशने सिव्हिल अभियंता पदवी घेतली. स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला. शिकवणी परवडणारी नसल्याने बसने मिरजेत जाऊन ग्रंथालयात परीक्षेचा अभ्यास केला. २०२२ मध्ये त्याने परीक्षा दिली. एप्रिल २०२३ मध्ये परीक्षेचा निकाल लागला. पहिल्या प्रयत्नातच शैलेशने यश संपादन केले.
त्यांच्या डोळ्यांत चमकतोय आनंदशैलेश याचे आई-वडील ऐकू व बोलू शकत नाहीत; मात्र मुलाने मिळविलेल्या यशाचा आनंद त्यांच्या डोळ्यात पाहून शैलेश यालाही समाधान वाटले. चवगोंडा व ललिता हे दाम्पत्य खाणा-खुणा करून मुलाच्या यशाचे वर्णन करीत आहेत.