लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शिराळा तालुक्यातील ३५ वर्षीय महिलेस निर्जन रस्त्यावर अडवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली.
अरुण ऊर्फ बाबू सुनील जमदाडे (२०, रा. सोनवडे, ता. शिराळा) असे त्याचे नाव आहे.
पीडित महिला ९ फेब्रुवारी २०२० या दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास काम आटोपून घरी पायी चालत निघाली होती. शेतालगत आल्यावर तेथे झाडीत लपून बसलेला अरुण जमदाडे आडवा आला. त्याने तिला अडवले. तिने प्रतिकार केल्यावर त्याने तिला मारहाण करत कालव्यात पाडले. यामध्ये ती जखमी झाली. तिने आरडाओरडा केला. मात्र, निर्जन वाट असल्याने कोणीही मदतीला आले नाही. याचा गैरफायदा घेत जमदाडे याने तिच्यावर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देत पलायन केले.
त्यानंतर पीडित महिलेने घरी येऊन हा प्रकार सांगितल्यावर कोकरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम यांनी जमदाडेला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाने सहा साक्षीदार तपासले. त्यातील सर्व साक्षी ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावली.
चौकट
आरोपी विकृत मनोवृत्तीचा
अरुण जमदाडे विकृत मनोवृत्तीचा आहे. पूर्वी त्याने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला होता. या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आल्यावर त्याने महिलेवर बलात्कार केला. पहिल्या गुन्ह्यात त्याला याच न्यायालयात १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाली, तर शनिवारी बलात्काराच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.