सांगली : गणेशोत्सवाच्या निमित्ताने चित्रपटाची गाणी वाजविण्यावरून अनेक संस्था, संघटनांनी नाराजी व्यक्त करीत भक्तिगीते लावण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून जनजागृती केली. सोशल मीडियावरही याचा जागर झाला. याचे चांगले परिणाम सांगलीत दिसत असून बहुतांश मंडळांनी चित्रपट गीतांना दूर करून भक्तीगीते, लोकगीते व ऐतिहासिक गीतांचे सूर जवळ केले आहेत.डीजेचा दणदणाट, त्यावर उडत्या चालीच्या चित्रपट गीतांची मालिका व नाचगाणी अशा स्वरूपात रंगणारा उत्सव आता बदलला आहे. गणरायाचे स्वागतही भारतीय परंपरेने करण्याकडे मंडळांचा कल वाढला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात गणरायाचे स्वागत झांज, ढोल-ताशा, लेझीम अशा पारंपरिक वाद्यांनी व त्यावरील बहारदार नृत्याने करण्यात आले. त्यानंतर आता प्रत्येक दिवशी सकाळी व सायंकाळी गणपतीसमोर भक्तिगीतांचे सूर ऐकू येऊ लागले आहेत. शहरातील बहुतांश मंडळांनी हा पायंडा पाडल्याने भाविकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. गणपती विसर्जनावेळीही पारंपरिक वाद्यांचे मोठ्या प्रमाणावर बुकिंग झाले आहे.
मंडळाच्या स्थापनेपासून आम्ही गणपतीसमोर भक्तिगीते लावतो. त्यामुळे अन्य मंडळांकडूनही तशी अपेक्षा होती. आता सांगलीतील सर्वच मंडळे भक्तिगीतात रमलेली पाहून मन सुखावते. - हेमंत काबरा, लक्ष्मी-नारायण मंडळ
भक्तिगीतांमुळे वातावरण प्रसन्न राहते. चित्रपटांतील कोणतीही गाणी देवासमोर लावणे योग्य नाही. हा चुकीचा प्रकार बंद झाला, ही बाब खूप महत्त्वाची आहे. पारंपरिक वाद्यांनाही आता पसंती दिली जात असल्याची बाबही चांगली आहे. - उदय टिकारे, झाशी चौक गणेशोत्सव मंडळगेल्या कित्येक वर्षांपासून अनेक हिंदुत्ववादी संघटना जनजागृतीसाठी राबल्यामुळे आज हे सकारात्मक चित्र दिसत आहे. ऐतिहासिक गाणी, पोवाडे, भक्तिगीतांनाही ग्लॅमर प्राप्त झाल्यामुळे तसेच नव्या चालीत ती न्हाऊन निघाल्याने तरुण पिढीलाही भावली. हे चित्र समाधानकारक आहे. - नितीन चौगुले, अध्यक्ष शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान
एकाचवेळी आरतीचा प्रस्ताव
याच परंपरेचा एक भाग म्हणून सर्व मंडळांच्या दारी ब्लूटूथ किंवा अन्य यंत्रणेद्वारे एकाचवेळी आरती लावून मंडळांनी त्यात सहभागी व्हावे, असा प्रस्ताव लक्ष्मी-नारायण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अन्य मंडळांना दिला आहे. यापूर्वी एकाचवेळी सर्वत्र एकच भक्तिगीताचा उपक्रम सांगलीत राबविला होता.