लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : दि. ३१ मे कित्येकांचा सेवानिवृत्तीचा दिवस, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो जाहीर कार्यक्रम न घेता साधेपणाने साजरा करावा लागला. भिलवडी (ता. पलूस) पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक जी. एच. घाडगे यांच्यासह परिवाराला पोलीस व्हॅनमधून सन्मानाने घरी पाठवून निरोप देण्यात आला. यावेळी घाडगेदादांचे डोळे पाणावले.
रात्री कर्तव्याचा शेवटचा दिवस संपवून घरी जाताना ऑफिसची गाडी सोडायला येते, यासारखा जीवनात दुसरा कुठलाच आनंद नाही, समाधानाचा क्षण नाही, असे सहायक पोलीस उपनिरीक्षक घाडगे म्हणाले. पोलीस दलातून ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निष्कलंक, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते निवृत्त झाले.
भिलवडी पोलिसांच्यावतीने घाडगे यांना सेवानिवृत्तीनिमित्त घरगुती वातावरणात निरोप देण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप यांनी स्वागत केले. यावेळी भिलवडी पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. घाडगे यांना विठ्ठलवाडी (ता. पलूस) येथील त्यांच्या घरी व्हॅनने सोडण्यात आले.
चौकट
विशेष पुरस्काराने गौरव
घाडगे यांनी कुंडल पोलीस ठाण्यात १४ वर्षांपासून उघडकीस न आलेला खुनाचा गुन्हा उघडकीस आणला होता. भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील दोन चोरीचे गुन्हे कौशल्यपूर्ण तपास करून उघडकीस आणल्याने पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी त्यांचा विशेष गौरव केला होता.