आटपाडी : आटपाडी ग्रामपंचायतीचे लवकरच नगरपंचायतीमध्ये रूपांतर करणार आहोत, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येथे गुरुवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार अनिल बाबर, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, प्रा. नितीन बानूगडे-पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, सुहास बाबर, वृषाली पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले की, आटपाडी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करून हे शहर राज्यात आदर्शवत करू. यासाठी भरघोस निधी दिला जाईल. आमदार बाबर ध्येयनिष्ठ असून एखादे काम हाती घेतले की ते काम पूर्ण तडीला नेण्यासाठी जिद्दीने मेहनत करतात. त्यांचेच शिष्य तानाजी पाटील असल्याने या गुरुशिष्याची जोडी आटपाडी तालुक्याला विकासाच्या दृष्टीने पुढे नेईल.
आमदार बाबर म्हणाले की, टेंभू योजनेचे पाणी संपूर्ण मतदारसंघातील शिवारात पोहोचवण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी आहे.
तानाजी पाटील म्हणाले की, आमदार बाबर यांच्यासोबत काम करताना फक्त सर्वसामान्य जनतेचे हित हेच लक्ष्य ठेवले. यावेळी पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. अण्णासाहेब पत्की, गणेश खंदारे, दत्तात्रय पाटील, सोमनाथ गायकवाड, बाळासाहेब होनराव, साहेबराव पाटील, राजेश नांगरे-पाटील, मुन्ना तांबोळी आदी उपस्थित होते.
डाळिंबाला संजीवनी देणार
टेंभू योजनेच्या कामाचे श्रेय कोणीही घेऊ देत; पण जनतेच्या मनामध्ये टेंभू योजनेचे जनक म्हणून आमदार अनिल बाबर यांचेच नाव कायम राहणार आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासोबत आमदार बाबर व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन डाळिंबाला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.