सांगली : केवळ शांततेचा संदेश देत श्रीनगर ते कन्याकुमारी असे ३ हजार ६५८ किलोमीटरचे अंतर धावत पार करण्याचा उपक्रम राजस्थानच्या सुफिया खानने सुरू केला आहे. मंगळवारी सांगलीत तिचे शहीद अशोक कामटे स्मृती फाऊंडेशन व शहीद मॅरेथॉन रनरच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले.
जगात शांतता नांदावी म्हणून राजस्थान येथील सुफिया खान ही तरुणी श्रीनगर ते कन्याकुमारी असे ३ हजार ६५८ कि.मी.चे अंतर धावत प्रवास करीत आहे. तिने दोन महिन्यांपूर्वी श्रीनगर येथून धावण्यास सुरुवात केली आहे. तिच्याबरोबर हरियाणा येथील विकाससिंग सोबत आहेत. तब्बल ६२ दिवस सतत धावत तिने मंगळवारी पहाटे सांगली गाठली. वाठार (ता. कºहाड) येथे तिचे स्वागत करण्यात आले. या ग्रुपच्या १०० हून अधिक सदस्यांनी व सांगलीच्या सायकलस्नेही ग्रुपच्या सदस्यांनी तिच्याबरोबर वाठार ते कोल्हापूरपर्यंत असा प्रवास केला.
आपुलकीच्या स्वागताने सुफिया भारावून गेली. जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या अनेक महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या कार्याला पुढे नेताना आनंद वाटत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील संघटनांनी दिलेले हे प्रेम सोबत राहील, असे तिने सांगितले. तिच्या या प्रवासाची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डनेही दखल घेतली असून, या उपक्रमाची नोंद पुस्तकात होणार आहे. सांगली जिल्ह्यात कासेगाव, पेठ, नेर्र्ले, येडेनिपाणी, येलूर, कणेगाव येथे तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. तिच्या या प्रवासात डॉ. चंद्रशेखर हळिंगळे, श्रीकांत कुंभार, अक्रम मुजावर, देवीदास चव्हाण, गणपत पवार, संतोष जाधव, सुधीर भगत, प्रदीप सुतार, श्वेता चिखली, अमित कांबळे, डॉ. मनालाल अंबीकाटक आदी सहभागी झाले होते. कर्नाटक, तामिळनाडूमार्गे ती जाणार आहे.