सांगली : राज्यभरात सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराविरोधात अंधश्रद्धेचे प्रकार सर्रास चालतात. यासंदर्भात निवडणूक आयोग व अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे अनेक तक्रारी येतात. भानामती आणि जादुटोणा हा खोटेपणा असून मतदारांनी निर्धास्तपणे योग्य उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन आयोग व अंनिसने केले आहे.नारळावर हात ठेऊन, भंडारा, अंगारा उचलून विशिष्ट उमेदवारालाच मतदानाची शपथ घ्यायला लावणे, विरोधकाच्या अंगणात काळी बाहुली, लिंबू मिरची, नारळाचा उतारा टाकणे, तथाकथित काळी जादू, करणी करणे, मतदारांना धार्मिक स्थळी शपथ घ्यायला लावणे, मांत्रिक- तंत्रिकांना गावात बोलवून मतदारांवर दबाव टाकणे असे प्रकार चालतात. हे प्रकार आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे असल्याचे निवडणूक आयोगाने म्हंटले आहे. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार ही कृत्ये गुन्हेगारी स्वरुपाची आहेत.आयोगाने आवाहन केले की, मतदारांनी अंधश्रद्धेला बळी न पडता निर्भिडपणे योग्य उमेदवाराला मतदान करावे. आयोगाने जारी केलेल्या चित्रफितींमध्ये विनोदी अंगाने मतदारांचे प्रबोधन केले आहे. अंनिसतर्फे या चित्रफितींचा महाराष्ट्राभर प्रसार करण्यात येत आहे. अंधश्रद्धेचे प्रकार आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन अंनिसतर्फे मुक्ता दाभोलकर, राहुल थोरात, फारुख गवंडी, बाबुराव जाधव, डॉ. संजय निटवे, प्रा. शंकर माने, वाघेश साळुंखे, सुनील भिंगे, रवी सांगोलकर, अमर खोत, मिलिंद देशमुख, प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव आदींनी केले आहे
'जादुटोणा, भानामती सारं खोटं, मतदानाच्या काळ्या शाईनं रंगवा बोटं'
By संतोष भिसे | Published: December 15, 2022 7:11 PM