लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : संचारबंदीत शहरात बिनधास्तपणे फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी मंगळवारी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम स्वत: रस्त्यावर उतरले. प्रत्येक वाहनाची स्वत: कसून तपासणी करून विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्याचे आदेश त्यांनी दिले. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात पोलिसांनी ही धडक कारवाई सुरू केल्यानंतर शहरातील रस्ते सामसूम झाले होते.
संचारबंदी लागू असल्याने अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडू नये, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. तरीही शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
रस्त्यावरील गर्दी पाहून पोलीस अधीक्षक गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, उपअधीक्षक अजित टिके पोलीस पथकासह रस्त्यावर उतरले. अधीक्षक गेडाम स्वत: प्रत्येक वाहनाची तपासणी करत होते. यात ठोस कारणांशिवाय फिरणाऱ्यांची वाहने तत्काळ जप्त करण्यात येत होती.
वैद्यकीय कारणासाठी व अत्यावश्यक कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांना सोडले जात हाेते. या तपासणीत अनेकांकडे बोगस ओळखपत्रे आढळून आली. स्वत: एसपी रस्त्यावर उतरून कारवाई करत असतानाही काही जण पोलिसांवर दबाव टाकत होते. त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश अधीक्षक गेडाम यांनी दिले.
बुधवार रात्री आठपासून संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत पोलिसांनी सहकार्याची आणि सामंजस्याची भूमिका घेतली होती. मात्र, नागरिक ऐकत नव्हते म्हणून आता कडक कारवाई सुरू करण्यात आली असून यापुढेही अधिक कारवाई करण्यात येईल, असे अधीक्षक गेडाम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
चौकट
बोगस ओळखपत्र गळ्यात
पोलिसांनी अचानकपणे सुरू केलेल्या तपासणी मोहिमेत अनेकांच्या गळ्यात असलेले ओळखपत्र हे बनावट असल्याचे आढळून आले. काही ओळखपत्रांची मुदत गेल्या वर्षीच संपली असताना त्यावर शहरात बिनधास्त फिरत होते. चारचाकी वाहनांवरही ‘अत्यावश्यक सेवा’, बोगस पास लावून फिरणाऱ्यांची वाहने पोलिसांनी जप्त केली.