लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: करजगी (ता. मिरज) येथील चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याचे पोलिस आणि वैद्यकीय तपासात स्पष्ट झाले आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास उपअधीक्षक सुनिल साळुंखे यांच्याकडे दिला आहे. आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी बारकाईने तपास करून दोषारोपपत्र दाखल केले जाईल. जलदगती न्यायालयात खटला चालवला जाण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अधीक्षक घुगे म्हणाले, करजगी येथील चार वर्षाची बालिका बेपत्ता झाल्याची माहिती गुरूवारी दुपारी एक वाजता उमदी पोलिस ठाण्यास मिळाली होती. गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात शोध मोहिम राबवली. आरोपी पांडुरंग याच्या हालचाली आम्हाला संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन घराची झडती घेतली. तेव्हा त्याने बालिकेचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह पोत्यात घालून पत्र्याच्या लोखंडी पेटीत ठेवल्याचे आढळले. बालिकेचे शवविच्छेदन केल्यानंतर तिच्यावर अत्याचार करून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
ते म्हणाले, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा तपास उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्याकडे दिला आहे. बारकाईने तपास करून दोषारोपपत्र दाखल करण्यास सांगितले आहे. आरोपीला लवकर शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयासमोर चालवला जाण्यासाठी न्यायालयास विनंती केली जाईल. या खुनानंतर गावातील प्रतिष्ठीत नागरिक व शांतता समितीची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या आहेत. संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घेण्यास सांगितले आहे.
अधीक्षक घुगे म्हणाले, मृत बालिकेच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजनेतून तातडीने मदत देण्यासाठी प्रयत्न केले जातील. गावात तणावाचे वातावरण नाही. तरीही दक्षता म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे उपस्थित होते.
आरोपीवर पूर्वी ‘पोक्सो’ चा गुन्हा
आरोपी पांडुरंग कळ्ळी याची पत्नी २० वर्षापूर्वीच त्याच्यापासून विभक्त झाली आहे. २०१६ मध्ये त्याच्यावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्यामुळे ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तीन वर्षे तो कारागृहात होता. त्यातून त्याची मुक्तता झाली होती.
दिशाभूल करू नका
खुनाच्या घटनेनंतर समाज माध्यमावर काहीजण मृत बालिकेचा फोटो टाकून पोस्ट प्रसारीत करत आहेत. परंतू पिडित मृत बालिकेचे नाव आणि फोटो प्रसारीत केल्यास कायदेशीर गुन्हा ठरू शकतो. त्यामुळे संयम ठेवून वादग्रस्त पोस्ट टाळाव्यात.