कडेगाव : पलूस-कडेगावचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात नव्या नगरपंचायत आणि नगरपालिकांना विकासासाठी भरघोस निधी द्या, अशी मागणी लावून धरली. यावेळी त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या टर्मच्या आमदारांना बोलू द्या, असे म्हणत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले.डॉ. कदम म्हणाले, पलूस नगरपालिका आणि कडेगाव नगरपंचायत २०१६ मध्ये स्थापन झाल्या आहेत. नवीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी राज्य सरकारकडून विकास निधी देण्याची तरतूद आहे. म्हणूनच, राज्य सरकारच्या माध्यमातून त्यासाठी भरीव विकास निधी द्यावा. तसेच, सांगली जिल्ह्यातील मॉडेल स्कूल माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यालाही वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा.सभागृहात बाेलत असताना अध्यक्ष महोदयांनी बेल वाजवली.
रात्री १० वाजेपर्यंत बसायची तयारी यावर विश्वजित कदम म्हणाले, माझी एवढीच विनंती आहे की काही आमदार तासभर बोलतात. ते ज्येष्ठ आहेत. त्यांना राज्यव्यापी विषय बोलायचे असतात. याबाबत आमचा आक्षेप नाही; परंतु पहिल्या व दुसऱ्या टर्मचे जे आमदार आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील विषय मांडायचे असतात. ते मांडण्याचा अधिकार त्यांना आहे. यामुळे या आमदारांना बोलण्याची संधी मिळाली पाहिजे. आमची रात्री १० वाजेपर्यंत बसायची तयारी आहे. संबंधित मंत्रीही उशिरापर्यंत बसतील. मात्र, नव्या आमदारांना बोलण्यासाठी वेळ द्यावा. असे म्हणत आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.यावेळी सागरेश्वर अभयारण्यातील हरीण, काळवीट, सांबर आदी वन्यप्राणी बाहेर पडून परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे अभयारण्याच्या कुंपणाचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची मागणी आमदार डॉ. कदम यांनी यावेळी केली.