मिरज पंचायत समितीत भाजपची सत्ता आहे. सभापती व उपसभापती पदांसाठी प्रत्येकी चार महिने संधी दिली होती. पण सुनीता पाटील यांचा कार्यकाल पूर्ण होऊनही त्यांनी राजीनामा दिला नव्हता. शेवटी विलंबाने का असेना, खा. संजय पाटील यांच्या सूचनेमुळे त्यांनी अखेर राजीनामा दिला.
मंगळवारी सुनीता पाटील यांनी पंचायत समितीचे ज्येष्ठ सदस्य विक्रम पाटील, काकासाहेब धामणे यांच्यासह साहेबराव जगताप, प्रमोद खवाटे, विष्णू कणसे यांच्या उपस्थितीत अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्याकडे राजीनामा दिला. पाटील यांनी राजीनामा दिल्याने सर्वच सदस्यांचा जीव भांड्यात पडला.
सभापतीपद खुल्या महिलेसाठी आरक्षित आहे. या पदासाठी अंकलीच्या त्रिशला खवाटे व बेडगच्या गीतांजली कणसे इच्छुक आहेत.
चौकट
निवड बिनविरोध करा
मिरज पंचायत समितीत सभापती पदाची संधी देताना पूर्व व पश्चिम भागाला समान न्याय दिला जात होता. मात्र भाजपच्या सत्ताकाळात सभापती पदासाठी पूर्व भागाला झुकते माप देताना पश्चिम भागाला उपेक्षित ठेवल्याने भाजप कार्यकर्ते नाराज आहेत. ही नाराजी दूर करण्यासाठी त्रिशला खवाटे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करून पश्चिम भागाला न्याय देण्याची मागणी कार्यकर्ते करीत आहेत.
चौकट
पतीराजाच्या उचापती निष्फळ
सभापतीपद टिकविण्यासाठी सभापतींच्या पतीने केलेल्या उचापतींची सदस्यांत चर्चा रंगली आहे. सभापतीपद कायम राहावे यासाठी पतीने राष्ट्रवादीमध्ये प्रवेशासाठी बड्या नेत्याची भेट घेतली. मात्र, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने, अगोदर राजीनामा, मग प्रवेश, अशी अट घातल्याने पतीची चांगलीच पंचाईत झाली. पद टिकविण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. तद्नंतर अनेक जे पंचायत समितीशी निगडित नसणारे विषय पुढे करून अडचण निर्माण केली. त्यातील एका विषयावरील तडजोडीनंतरच राजीनामा दिला.