इस्लामपूर : समाज चांगला वक्ता घडवीत असतो; मात्र सामाजिक प्रश्नांचे भान जपून समाजाला विधायक दिशा देणाऱ्या वक्त्यांची आज वानवा आहे. अशावेळी व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता केवळ सामाजिक प्रश्नांसाठी झोकून देऊन संघर्षाची भूमिका घेतील, अशा उद्याच्या वक्त्यांसाठी व्यासपीठ तयार करण्याचे कार्य प्रा. एन. डी. पाटील प्रतिष्ठान व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी केले.येथील कर्मवीर महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. माजी प्राचार्य विश्वास सायनाकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या नाशिक येथील विवेक मोहन चित्ते याला सन्मानित करण्यात आले.हौसेराव सर्जेराव हुबाले हा इस्लामपूरचा विद्यार्थी द्वितीय आला, तर सातारच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा किरण संजय किर्तीकर हा तृतीय आला. सुनील पार्ले (गडहिंग्लज), विजय चौगुले (कोल्हापूर), भरत रिडलॉन (औरंगाबाद) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.डॉ. नंदकुमार मोरे (कोल्हापूर), प्रा. सुभाष कोरे (गडहिंग्लज) व प्रा. आनंद साठे (मेढा) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रा. एकनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सौ. एम. एस. पाटील यांनी परिचय करून दिला. प्रा. हरिष शिंदे यांनी निकालपत्राचे वाचन केले. एम. के. बाड, प्राचार्य डॉ. जे. के. पाटील, एल. डी. पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
विधायक दिशा देणाऱ्या समाजामध्ये वक्त्यांची वानवा
By admin | Published: January 19, 2015 11:36 PM