शरद जाधव -- सांगली‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...’ वृक्षांना आपला सखा-सोयरा समजा, असे सांगणाऱ्या या अभंगातून झाडांचे आपल्या जीवनातील महत्त्व अधोरेखित होते. मात्र, आज झाडांची बेसुमार होणारी कत्तल आणि पर्यावरणाचा ऱ्हास याचा दुष्परिणाम आपणाला भोगावा लागत आहे. जागतिक वन दिनाच्या निमित्ताने का होईना, झाडे लावण्याचा आणि त्यांचे योग्य संगोपन करण्याचा मनोमन संकल्प करायलाच हवा. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात मात्र देशी झाडांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न चालू झाले आहेत. सर्वसामान्यजनांना वनांचे आणि पर्यायाने झाडांचे महत्त्व समजावे, यासाठी वन दिन साजरा करण्यात येतो. मात्र, दुर्दैवाने समाजाला झाडांचे महत्त्व समजलेच नाही असे म्हणावे लागते. आपल्याला जगण्यासाठी लागणारा प्राणवायू आपणाला उपलब्ध करुन देण्याची झाडांची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, आपणच कोणताही विचार न करता झाडांची कत्तल करतो. यातून धोक्याची जाणीव होत असल्यानेच, कदाचित आता सर्वच भागात वृक्षांचे महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न चालवले आहेत. सांगली जिल्ह्याचा भौगोलिक अभ्यास केला, तर जिल्ह्यात अनेक ठिकाणे प्रेक्षणीय स्थळे होत आहेत. जिल्ह्यातील चांदोली, सागरेश्वर, दंडोबा, चौरंगीनाथ आदी ठिकाणची वृक्षसंपदा सर्वांनाच आकर्षित करते आहे. जैवविविधता पार्कच्या माध्यमातून जिल्ह्यात खंबाळे आणि बोलवाड याठिकाणीही नैसर्गिकदृष्ट्या परिपूर्ण ठिकाणे तयार होणार आहेत. सध्या आपल्या अवतीभोवती दिसणारी बहुतांश झाडे ही परदेशी आहेत. त्यात प्रामुख्याने निलगिरी, सिल्व्हर ओक, गुलमोहर, गिरीपुष्प, काशीद, रेन ट्री, टॅबूबिया, सुरु आदी झाडे निश्चितच आपल्या सवयीची झाली असली आणि त्यांचा डेरेदारपणा, लक्षवेधी फुले आकर्षक असली तरी, त्यांचा आपणास उपयोग नसल्याचे मत जाणकार व्यक्त करतात. या झाडांवर कधीही पक्षी राहत नाहीत, असा अनुभव आहे. त्यामुळे या परदेशी झाडांऐवजी वड, पिंपळ, करंज, तामण, बहावा, लिंब, पळस, पांगेरा, शिसव, चिंच, कवठ, उंबर, देशी जांभूळ, देशी आंबा आदी झाडांच्या संवर्धनासाठी पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. या सर्व झाडांपासून माणसांना काही ना काही फायदा मिळणार आहे. वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनातील झाडांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वृक्षांना घरातील एक सदस्य समजून त्यांची देखभाल केली, तरच आपला भविष्यकाळ सुखकर असणार आहे. झाडांच्या देखभालीसाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे. येत्या होळी सणाच्यावेळी वृक्षांची तोड करून सण साजरा केला जाऊ नये. - पापा पाटील, वृक्षप्रेमी, सांगली.
देशी वृक्ष संवर्धनासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम
By admin | Published: March 21, 2016 12:42 AM