लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शासनाच्या शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने विशेष शोधमोहीम राबविण्याबाबत सहविचार सभा घेतली.
महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानाच्या शासन निर्णयानुसार तसेच महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार व प्रशासन अधिकारी बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती क्रमांक २ मधील वाॅर्ड क्रमांक १०, १५, १७, १८, १९ मधील एकूण ७८ शाळांमधील मुख्याध्यापकांची महापालिकेच्या शाळा क्रमांक ७, केसीसी प्राथमिक शाळा सांगली, अभिनव प्राथमिक शाळा श्यामरावनगर, उद्योगरत्न वेलणकर शाळा, सांगली या पाच ठिकाणी या सभेमध्ये शासन निर्णयाचे वाचन करण्यात आले.
तसेच अ, ब, क, ड या पत्रांनुसार मुलांची शोधमोहीम घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. या प्रभागामध्ये येणाऱ्या या सर्व शाळांनी घर-टू-घर सर्वेक्षण करणे व सर्वेक्षणांमध्ये परिसरामधील अधिकारी, पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, समाजातील नागरिक, शिक्षणप्रेमी, शिक्षणतज्ज्ञ यांचा शोधमोहिमेमध्ये सहभाग घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. १ मार्च ते १० मार्चअखेर शाळाबाह्य मुले शोधमोहीम सर्वेक्षण पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. वॉर्डनिहाय वाॅर्डातील शाळांना भाग वाटून देण्यात आले.