संतोष भिसे/मोहन मोहिते, लोकमत न्यूज नेटवर्क, वांगी: गावातील मुलगी लग्न करून बाहेर जाणार, त्या मुलीला गावाची आठवण सतत व्हावी, यासाठी शिवणी (ता. कडेगाव) ग्रामपंचायतीने गावातील प्रत्येक नवविवाहित मुलीला लग्नाच्या आदल्या दिवशी माहेरची साडी देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
ग्रामपंचायतीच्या बैठकीत सरपंच संदीप पवार, उपसंरपच सुजाता माळी, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक सचिन शिर्के यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला. प्रत्येक नवविवाहितेला माहेरची साडी देऊन ओटी भरण्याचे ठरले. त्याचवेळी नवविवाहितेकडून स्त्रीभ्रूण हत्या करणार नाही, अशी शपथही घेण्यात येत आहे. या उपक्रमासाठी ग्रामपंचायतींने स्वनिधीतून खर्च केला आहे. आजवर स्नेहल सुधीर पवार, काजल यशवंत सरगर, सानिका हणमंत चव्हाण या नवविवाहितांना माहेरची साडी दिली आहे. ग्रामपंचायतीचा हा उपक्रम सासरी जाणाऱ्या मुलींसाठी संस्मरणीय ठरला आहे. स्नेहल पवार म्हणाल्या की, गावाने दिलेली माहेरची साडी जन्मभर मनात स्थान करून राहील. स्त्रीभ्रूण हत्या न करण्याच्या शपथेचे पालन आयुष्यभर करेन. सरपंच पवार म्हणाले, हा उपक्रम ग्रामस्थांना आवडला असून ग्रामपंचायतीतर्फे कायमस्वरुपी राबविला जाईल.