सांगली : सातारा रेल्वेस्थानकापेक्षा वीस पट जास्त उत्पन्न देणाऱ्या किर्लोस्करवाडी स्थानकावर मध्य रेल्वेकडून वारंवार अन्याय होत आहे. ज्या चार गाड्यांना किर्लोस्करवाडीत थांबा मिळतो त्या सर्व गाड्यांना या स्थानकामुळे मोठे उत्पन्न मिळाले आहे. तरीही कोणत्याही नव्या गाडीला साताऱ्यात थांबा देऊन किर्लोस्करवाडीला नाकारला जातो. त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.सांगली जिल्ह्यातील पलूस, कडेगाव, तासगाव, खानापूर व वाळवा या पाच जिल्ह्यांतील दहा लाख लोकसंख्या किर्लोस्करवाडी रेल्वेस्थानकावर अवलंबून असतानाही कुठल्याही नवीन रेल्वेगाड्या तसेच उन्हाळी, दिवाळी व होळी स्पेशल रेल्वेगाड्यांना किर्लोस्करवाडीत थांबा दिला जात नाही.किर्लोस्करवाडी व सांगली येथील प्रवासी संघटनांनी वारंवार मध्य रेल्वे, रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्डाला संपर्क साधून किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर दिल्लीला जाणारी वास्को निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस, मिरज-निजामुद्दीन दर्शन एक्स्प्रेस व पुणे-मिरज एक्स्प्रेस तसेच इतर अन्य गाड्यांचा थांबा देण्याची मागणी केली होती.त्यापैकी फक्त दादर-हुबळी एक्स्प्रेस व मिरज-पुणे (साप्ताहिक) एक्स्प्रेस या दोन गाड्यांना किर्लोस्करवाडी स्थानकावर थांबा देण्यात आला. पण, त्यापैकी फक्त पुणे-मिरज (साप्ताहिक) एक्स्प्रेसचा थांबा सुरू करण्यात आला. दादर-हुबळी (दररोज) एक्स्प्रेसचा थांबा अद्याप सुरू करण्यात आलेला नाही.
अडीच कोटींवर उत्पन्नपश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी औद्योगीकनगरी असलेल्या किर्लोस्करवाडी स्थानकावर फक्त दररोज चार एक्स्प्रेस गाड्याच थांबतात. त्या गाड्यांमधून किर्लोस्करवाडी स्थानक प्रत्येक वर्षाला २.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न देते.
किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवरून मिरज-पुणे (साप्ताहिक स्पेशल) एक्स्प्रेस गाडीला आरक्षित व जनरल अनारक्षित तिकिटांची विक्री वाढत असून दि. ७ मे रोजी गाडी (क्र. ०१४२४)ला किर्लोस्करवाडी व सांगलीतून चांगली तिकीट विक्री नोंदली गेली.
मिरज--पुणे साप्ताहिक एक्स्प्रेसचे सांगलीतील उत्पन्न
- स्लीपर तिकिटे (७६) - २१,६६० रु.
- थ्री टिअर स्लीपर तिकिटे (१५) - ११,५५०
- टू टिअर स्लीपर तिकिटे (२) - २,०५०
- अनारक्षित तिकिटे (१००) - १०,०००
- एकूण उत्पन्न - ४५,२६०
किर्लोस्करवाडीतील उत्पन्न
- स्लीपर तिकीटे (२१) - ५,९८५ रु.
- थ्री टिअर एसी (६) - ४,६२०
- अनारक्षित तिकिटे (४०) - ३,६००
- एकूण उत्पन्न - १४,२०५
साताऱ्याचे उत्पन्न केवळ ५७०सातारा स्थानकावरुन पुणे साप्ताहिक विशेष गाडीसाठी केवळ २ स्लीपर तिकिटांची विक्री झाली असून त्यातून ५७० रुपये उत्पन्न मिळाले आहे. लोणंद, जेजुरी स्थानकावरून एकही तिकीट विकले गेले नाही.
या गाड्यांना नाही मिळाला थांबामिरज जंक्शनवरून सुरू केलेल्या मिरज-निजामुद्दीन दर्शन एक्स्प्रेस तसेच हुबळी-ऋषिकेश उन्हाळी स्पेशल, हुबळी-मुजफ्फरपूर उन्हाळी स्पेशल अशा महत्त्वपूर्ण गाड्यांना किर्लोस्करवाडीत थांबा देण्यात आला नाही.