मिरज : खटाव (ता. मिरज) येथे गावात दारूबंदीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष महिला ग्रामसभा बोलावण्याचे आदेश गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी दिले आहेत.
खटावमध्ये दलितवस्तीतील देशी दारू दुकानामुळे गावातील ग्रामस्थांना, लहान मुलांना तसेच महिलांना नाहक त्रास होत असल्याची तक्रार आहे. खटाव येथील ग्रामस्थांनी उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. गावातील देशी दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्यासाठी महिला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची सूचना गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी ग्रामसेवक व सरपंचांना दिल्या आहेत. शासन नियमाप्रमाणे ग्रामसभा घेऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत. खटाव गावात दारूबंदीसाठी महिला विशेष ग्रामसभेस उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.