मिरज : दोन वर्षांपूर्वी कृष्णा नदीला आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय जल आयोगाचे कार्यकारी अभियंता अभिषेक गौरव यांनी सांगली जिल्ह्यात जल आयोगाच्या निरीक्षण केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. जल आयोगातर्फे संभाव्य महापुरासाठी उपाययोजना म्हणून १ जूनपासून कृष्णा नदीतून वाहणाऱ्या पाण्याची पातळी व गती मोजण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
ऑगस्ट २०१९ मध्ये सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराने दोन्ही जिल्ह्यांत अनेक शहरे, शेकडो गावे, वाड्या-वस्त्या पाण्याखाली गेल्या होत्या. यावर्षीही मान्सूनपूर्व मोसमी पाऊस वेळेपूर्वीच दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने महापुराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील केंद्रीय जल आयोगाच्या सर्व केंद्रांमार्फत कृष्णा नदी व कृष्णा नदीस मिळणाऱ्या सर्व उपनद्यांचे वर्षभर निरीक्षण करण्यात येते.
संभाव्य महापुराबाबत दक्षता म्हणून पावसाळ्यापूर्वी केंद्रीय जल आयोगाचे मुख्य कार्यकारी अभियंता अभिषेक गौरव यांनी नांद्रे, समडोळी, कुरुंदवाड, अर्जुनवाड, तेरवाड यासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील आयोगाच्या विविध केंद्रांना भेटी दिल्या. मिरजेत कृष्णा नदीपलीकडे अर्जुनवाड येथे जल आयोगाचे केंद्र असून, येथे नदीच्या पाण्याची खोली व गती दरारोज मोजण्यात येते. मात्र, महापुराचा अंदाज घेण्यासाठी १ जूनपासून दरारोज प्रत्येक तासाला पाणी पातळीच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. जल आयोगाच्या विविध केंद्रांत होणाऱ्या पाणी पातळीच्या नोंदींवर कोयना व आलमट्टी धरणातून विसर्ग ठरविण्यात येतो.
चौकट
उपकेंद्रांद्वारे पाण्याचे मोजमाप
केंद्रीय जल आयोगाची सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीवर कराड, निपळी, वारंजी, तारगाव, नांद्रे, समडोळी, अर्जुनवाड, कुरुंदवाड, तेरवाड ही उपकेंद्रे आहेत. या उपकेंद्रांद्वारे नदीपात्रातून वाहणाऱ्या पाण्याचे मोजमाप व संभाव्य महापुराचे निरीक्षण करण्यात येते.
चाैकट
स्वयंचलित पर्जन्यमापक, पाणी तपासणीसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा
मिरजेत सध्या पाच मीटर पाणी पातळी असून पूरप्रसंगी ही पाणी पातळी मिरजेत २२ व सांगलीत २० मीटरपर्यंत जाते. मिरजेजवळ अर्जुनवाड येथील आयोगाच्या केंद्रात स्वयंचलित पर्जन्यमापक, पाणी तपासणीसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा आहे. पाण्याची पातळी, गती, उंची, खोली आदींचे मोजमाप करण्यासाठी उपकरणे आहेत.