लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : शिराळा पश्चिम भागात गुढे-पाचगणीच्या पठारावर शिरसटवाडी हद्दीत सुझलॉन पवनऊर्जा कंपनीच्या टाॅवरमध्ये स्फाेट झाला. पवनचक्कीच्या सुमारे अडीच टन वजनाच्या पात्याच्या अक्षरश: ठिकऱ्या झाल्या. ही घटना मंगळवारी सकाळी दहाच्या दरम्यान घडली. पात्यांचे तुकडे सुमारे तीनशे मीटर अंतरापर्यंत पडले हाेते.
गुढे-पाचगणीच्या पठारावर मोठ्या प्रमाणावर पवनचक्की प्रकल्प सुरू आहेत. याच पठारावर शिरसटवाडी हद्दीत सुझलॉन कंपनीचे अनेक टॉवर उभे आहेत. मंगळवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास एका टॉवरवर अचानक स्फोट झाला. त्याचा मोठा आवाज झाला. त्यानंतर एकामागून एक स्फोटाचे आवाज येऊ लागल्याने पठाराच्या पायथ्याला असणाऱ्या शिरसटवाडी, खटिंगवाडी, माळवाडी, सावंतवाडी येथील लोक घराबाहेर आले. प्रारंभी कशाचा आवाज आहे, हे न समजल्याने अनेक तर्कवितर्क झाले. आवाज डोंगराच्या बाजूने येत असल्याचे दिसले. त्यावेळी संपूर्ण टॉवर हलत होता. सोबत एकसारखे मोठे आवाज होत होते. काही वेळाने टॉवरचे सुमारे अडीच टन वजनाचे पाते मोडून पडले. दुसरे पाते उभे चिरले हाेते, तर तिसरे पाते टॉवरवर आदळत होते. स्फोट झालेल्या पात्याच्या ठिकऱ्या होऊन तीनशे मीटर परिसरात उडून पडल्या. टॉवरपासून शंभर मीटरवर अन्य पवनचक्क्या आणि निनाई मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. दर मंगळवारी या मार्गावर लोकांची वर्दळ असते. मात्र, घटनेवेळी या टप्प्यात काेणी नसल्याने अनर्थ टळला. तांत्रिक बिघाडामुळे स्फोट झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
सावंतवाडी येथील रमेश मस्कर, शिरसटवाडी येथील पांडुरंग शिरसट म्हणाले की, जसा आवाज होईल, तसा हा टॉवर जमिनीपासून वरपर्यंत झुलत होता. प्रत्येक झाेताबराेबर तो कोसळेल, असे वाटायचे. अखेर दोन पाती मोडून पडल्यानंतर हालचाल थांबली. मेणी, रांजणवाडी, पाचगणी येथील लोकांनाही स्फाेटाचे आवाज ऐकू आले. मात्र, ते कशाचे आहेत, हे लवकर दिसले आणि समजलेही नाही.
चाैकट
बॉम्ब पडल्याची अफवा
गुढे-पाचगणी पठाराच्या पायथ्याला असणाऱ्या वाड्या-वस्त्यांवर नेहमीची लगबग सुरू होती. अचानक एकामागून एक मोठ-मोठे आवाज कानी पडू लागले. दणकेबाज आवाजाने लाेक घराबाहेर धावले. कुणी टायर फुटल्याचा, तर कुणी वीज पडल्याचा अंदाज बांधला, पण आवाजाची तीव्रता पाहून कोठेतरी बाॅम्बच पडला असावा, अशी चर्चा सुरू झाली. आवाजाच्या दिशेने डाेंगराकडे पाहिले असता, पवनचक्कीच्या टॉवरचे तुकडे पडत होते.