संतोष भिसे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मागणी आणि सिझन नसतानाही मसाल्यांचे दर भरमसाट वाढले आहेत. गेल्या दोन महिन्यांत सरासरी ३० ते ५० टक्क्यांची दरवाढ झाली आहे. दिवाळीनंतर ते आणखी वाढतील, असे व्यापारी वर्तुळातून सांगण्यात आले.
मार्च ते मे हा मसाल्यांच्या उच्चांकी मागणीचा कालावधी असतो. यंदा लॉकडाऊन असतानाही बाजारपेठ तेजीत राहिली. त्यानंतर दर स्थिर राहणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. प्रत्येक महिन्यात १०-२० टक्क्यांची दरवाढ होत राहिली. घटलेले उत्पादन, लॉकडाऊनमुळे खोळंबलेली वाहतूक, अफगाणिस्तानमधील संघर्ष अशा कारणांनी मसाल्यांचा तडका वाढला आहे.
कोट
अफगाणिस्तानमुळे शहाजिरे महागले
अफगाणिस्तानमधील संघर्षामुळे शहाजिरे महागले आहेत. सर्वच मसाले ५० टक्क्यांपर्यंत महागले आहेत. दिवाळीपर्यंत दर स्थिर राहून पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
- आशिष शहा, मसाले व्यापारी, सांगली.
सध्या हंगाम नसतानाही मसाल्यांची दरवाढ पहायला मिळत आहे. उत्पादन कमी झाल्याचा हा परिणाम असल्याचे घाऊक बाजारपेठेतून सांगितले जात आहे. पुरवठाही मर्यादित आहे.
- गणेश पाटील, मसाले व्यापारी, मिरज.
कोट
महागाई आहेच, पण पर्यायही नाही
मसाल्यांची दरवाढ अनाकलनीय आहे. मे महिन्यात चटणी तयार केली, तेव्हा मसाले इतके महाग नव्हते. पर्याय नसल्याने सध्या स्वयंपाकापुरते मसाले आणते. दरवाढीमुळे तयार मसाल्याची पाकिटे परवडतात.
- सरिता ठाणेकर, गृहिणी, सांगली.
किरकोळ बाजारात दर वाढल्याने मार्केट यार्डात गेले, तेथेदेखील किमती वाढल्याचे सांगितले. महागाईमुळे खरेदी कमी प्रमाणात करावी लागत आहे. मसाल्यांचे बजेट वाढविणे सध्या तरी शक्य नाही. तयार मसाल्यांना पसंती दिली आहे.
- अर्चना खटावे, गृहिणी, माधवनगर.
असे वाढले दर (प्रतिकिलो)
जुने दर नवे दर
रामपत्री ६०० ८००
बदाम फूल ८०० ११००
लवंग ६०० ७५०
काळी मिरी ३५० ५००
नाकेश्वरी ११०० १५५०